Asha Bhosale Pudhari
सातारा

Asha Bhosale: ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं...‌’

महाबळेश्वरातील साहित्य संमेलनातील आशाताईंच्या आठवणींना उजाळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ‌ ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं‌’ हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर आहे. या गीतातून साताऱ्याशी जुळलेली नाळ आणि आपल्या सुरेल आवाजाने संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे. सन 2009 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संमेलन महाबळेश्वर येथे पार पडले होते. या संमेलनाचे उद्घाटन आशा भोसले यांच्या हस्ते झाले होते. थंड हवेच्या पर्यटनस्थळी झालेल्या या साहित्य मेळाव्यात त्यांच्या उपस्थितीने वेगळीच रंगत आणली होती.

उद्घाटनप्रसंगी आशाताईंनी केलेले भाषणही त्यांच्या गायकीप्रमाणेच सुरेल आणि हृदयस्पर्शी होते. ‌‘कवींनी माझे गाणे, तर लेखकांनी माझे जीवन समृद्ध केले,‌’ असे सांगत त्यांनी साहित्याशी असलेले आपले नाते उलगडले. ‌‘मी कविता वाचायला गेले नाही, त्या माझ्याकडेच आल्या,‌’ या त्यांच्या विधानाने उपस्थित रसिक भारावून गेले होते. यावेळी त्यांनी ‌‘दिन तैसे रजनी झाले गे माये‌’ ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ओवी गायल्यानंतर समोरच्या श्रोत्यांकडे पहात त्या म्हणाल्या होत्या वारकरीपंत सांगा हे गाणं कुणाचं आहे? मात्र, श्रोत्यामधून ते कोणालाही सांगता आले नव्हते. त्यावर हे गाणं ज्ञानेश्वरांनी गायले आहे. तुम्हाला तुमचं गाणं ओळखता आले नाही का? असा टोला त्यांनी लगावला होता.

कवी भा. रा. तांबे, ना. धो. महानोर, ग्रेस, सुरेश भट यांच्या कविताही त्यांनी गुणगुणल्या. त्यांच्या या सादरीकरणाने संमेलनातील वातावरण भारावून गेले होते. तसेच, आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगताना त्यांनी साने गुरुजी, ना. सि. फडके, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे यांसारख्या साहित्यिकांच्या पुस्तकांचा उल्लेख केला. साहित्याने केवळ आनंदच नाही, तर आत्मसन्मान आणि नम्रतेची शिकवण दिल्याचेही त्यांनी नमूद केले होते. चिं. वि. जोशी यांच्या पुस्तकांनी मुला खूप हसवले.

मी हसले की सासुबाई म्हणायच्या अगं आशा असं काय भिताड पडल्यासारखी हसतीयास, गडकरी, पुं. ल. यांच्या पुस्तकांनीही निर्भेळ आनंद दिल्याचेही त्यांनी नमूद केले होते. महाबळेश्वरातील त्या साहित्य संमेलनात आशाताईंनी केलेले भाषण आणि सादरीकरण आजही साहित्यप्रेमींना प्रेरणा देणारे ठरत आहे. त्यांच्या आवाजातील जादू आणि शब्दांतील आत्मीयता यामुळे तो क्षण आजही रसिकांच्या स्मरणात ताजा आहे.

आशाताई भोसले यांचे साताऱ्याशी अतूट नाते होते. मी जिल्हाधिकारी असताना त्या काही कामानिमित्त साताऱ्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माझी आवर्जून भेट घेतली होती. या भेटीत साताऱ्याच्या निसर्गसौंदर्याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या दूरदृष्टीतील सातारा आता नावारुपास येऊ लागला आहे.
- विकास देशमुख, माजी जिल्हाधिकारी व सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT