देवपूर : ‘दम असेल तर तुम्हीपुढे या. पुतण्याला पुढे करू नका. बघूयात कुणाच्यात किती दम आहे ते. तुम्ही, जिथं जाल तिथं तुमचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे यांनी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले.
विरळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी सौ. सोनिया गोरे, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, शिवाजीराव शिंदे, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह गण गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अरुण गोरे म्हणाले, बरेच दिवस नाटक करणारे विधानसभेला कोणत्या पार्टीत होते. कधी काँग्रेस, कधी भाजप, कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी शरद पवार गट, आता ते कुठे आहेत, हे माहीत नाही. आजपर्यंत लबाडीने दुसऱ्याची टीमकी वाजवायचे काम करणाऱ्या अनिल देसाई यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन अरुण गोरे यांनी केले.
यावेळी सौ. सोनिया गोरे, शिवाजीराव शिंदे, चिन्मय कुलकर्णी, प्रशांत गोरड, सचिन होनमाने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन चंद्रकांत कोकाटे यांनी केले. आभार बाळासाहेब कटरे यांनी मानले. यावेळी सदाभाऊ बनगर, दत्तात्रय हांगे, बबनराव काळेल, अर्जुन बनगर, सतीष काटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.