औंध : आजचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे शिक्षण घेणे गरजेचे आहे. औंधसारख्या सुंदर परिसरात उभारलेल्या नूतन शाळेमधून सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचाराचा समाज घडवावा, यासाठी सर्व शिक्षकांनी व शाळेतील प्रत्येक घटकांनी इच्छाशक्ती दाखवावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
औंध येथे औंध शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सोळस्कर, सुनील माने, उदयसिंह पाटील उंडाळकर, राजेश पाटील वाठारकर, रणजित देशमुख, अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन व औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक हरिष पाटणे, संस्थेच्या व्हॉइस चेअरमन चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, संस्थेच्या सदस्या हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
औंध शिक्षण मंडळाच्या संस्थेला एक वेगळी पार्श्वभूमी व वेगळा इतिहास असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्यावेळी बहुजन समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडली नव्हती. त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन श्रीमंत भगवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी शैक्षणिक प्रगती घडवून आणली. या शाळेमध्ये साने गुरुजी, ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, किर्लोस्कर यासारख्या महान व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. आता काळ बदलला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारखे आधुनिक प्रकारचे शिक्षण आताच्या पिढीला देण्याची गरज आहे.
शाळेच्या शैक्षणिक कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे. या शाळेमधून उत्तमातील उत्तम मुले भविष्यात तयार झाली पाहिजे यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. जगात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यात औंध, खटावमधील मुलांना एआयचे शिक्षण घेता यावे यासाठी अडीच एकर परिसरामध्ये दिमाखदार इमारत उभारण्यासाठी सर्वजन मिळून प्रयत्न करू. प्रास्तविक सौदामिनी सांगलीकर यांनी केले. सूत्रसंचलन राजेंद्र माने, प्रशांत खैरमोडे, शाकिर आतार यांनी केले. आभार प्रदिप कणसे यांनी मानले.