सातारा : श्रीमंत गणेश उत्सव मंडळाची गणेश मूर्ती व आगमन सोहळ्यातील नेत्रदीपक आतिषबाजी.  Pudhari Photo
सातारा

सातार्‍यात मानाच्या गणेशमूर्तींचे दणक्यात आगमन

शहरात उत्सवाच्या तयारीला वेग; कार्यकर्त्यांची धांदल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सातारा शहरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मानाच्या गणेश मूर्तींचे वाद्यांच्या गजरात दणक्यात आगमन होऊ लागले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आगमन सोहळ्याच्या पूर्वतयारीत मंडप उभारणी, विविध परवानग्यांसाठी धांदल उडाली आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने गणेश भक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. उत्सव सुरळीत व शिस्तबद्धतेत पार पडावा, यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी आग्रही राहत आहेत. सर्व कार्यकर्त्यांना कामांचे वाटप करून विविध जाबाबदार्‍या देण्याला प्राधान्य दिले जात आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक मंडळांचे मंडप सांगाडे उभारून उर्वरीत काम पावसामुळे खोळंबली आहेत. विविध परवानग्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घातले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुनरागमन केल्याने यामध्ये अडथळा येत आहे.

सातारा शहरातील विविध गणेश मंडळांच्या मानाच्या गणेश मूर्ती वाजत गाजत आगमन होऊ लागले आहे. सोमवारी सायंकाळी शहरातील श्रीमंत गणेश उत्सव मंळडळाच्या सातारचा श्रीमंत या गणेशमूर्तीचे आगमन झाले. ढोल-ताशासह वाद्याचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मूर्ती मंडळामध्ये दाखल झाली. या आगमन सोहळ्यात हजारो गणेशभक्तांनी पावसाची पर्वा न करता मिरवणुकीत सहभागी होत वाद्याच्या तालावर ठेका धरला होता. दरम्यान, सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती दाखल झाल्या असल्या तरी ग्रामीण भागातील गणेश मंडळेही सज्ज होऊ लागली आहेत. आगमन व विसर्जन मिरवणुकींसाठी ढोलताशा बरोबरच लेझीम पथकांनाही सादरीकरणाच्या ऑर्डर दिल्या जात आहेत.

अवघ्या जनजीवनाला आतुरता...

बुद्धिदेवता गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता अवघ्या जनजीवनाला लागली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांबरोबर घरगुती उत्सवाची तयारी जोमात सुरू आहे. साफसफाई, रंगकाम आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच पूजा-आर्चा, उपासनेबरोबरच सजावटही उत्सवातील महत्त्वाचा भाग ठरत आहे. त्यामुळे यावर्षी कोणत्या थीमवर सजावट करायची यासाठी सोशल माध्यमांचा आधार घेतला जात आहे. दरवर्षीपेक्षा हटके सजावटीला प्राधान्य दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT