Anna Bhau Sathe statue 
सातारा

Anna Bhau Sathe statue: लोकशाहीर अण्णा भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : हलगीचा कडकडाट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : हलगीच्या कडकडाटात ऐतिहासिक शाहू चौकात दिमाखदार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सुनील काटकर, ॲड. डी. जी. बनकर, विनोद खंदारे, अमर गायकवाड, अण्णा वायदंडे, गणेश भिसे, उमेेश चव्हाण तसेच शेकडो सातारकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान साताऱ्यात हेलिपॅडवर उतरल्यानंतर थेट शाहू चौकात 11.15 वाजता पोहोचले. प्रथम अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. पुतळ्याचे अनावरण होत असताना परिसरात हलगीचा कडकडाट करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा जयघोष करत घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. तसेच, फटाक्यांची आतषबाजी व ढोल- ताशाचाही गजर करण्यात आला.

अण्णा भाऊ साठे कृती समितीच्या वतीने मान्यवरांचे सातारी कंदी पेढ्याचा हार घालून स्वागत केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री यांच्यासोबत सातारा पालिकेचे नगरसेेवक, नगरसेविका व अण्णा भाऊ साठे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो काढले. दरम्यान, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र्यासह सर्व मान्यवरांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज व शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केले.

पुतळा अनावरणाचा मला आनंद : मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांची लेखणी ही गरिबांचा आवाज ठरली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये क्रांतीची ज्योत पेटवण्याचे काम अण्णा भाऊंच्या लेखणीमुळे झाले. सातारा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी मला यायला मिळाले, याचा मला खूप आनंद आहे, असे उद्गार मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT