सातारा

Anil Desai: अनिल देसाईंसह दोषींवर गुन्‍हे दाखल करण्‍याचे आदेश

मयत सभासदांच्‍या नावावर कर्ज वाटप करून भ्रष्‍टाचार : विधानपरिषदेत लक्षवेधी : डीडीआर, एआर निलंबित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / खटाव : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीत मयत सभासदांच्या नावे बोगस कर्ज वाटप करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तत्‍कालीन जिल्‍हा उपनिबंधक, पोलिस आणि सातारा जिल्हा बॅंकेकडे तक्रार करूनही कुणीच चौकशी केली नाही. तसेच, पीडितांना सहकार्य केले नाही, म्हणून तत्‍कालीन एआर (सहायक निबंधक) आणि डीडीआर (जिल्‍हा उपनिबंधक) यांना निलंबित करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधिमंडळ सभागृहात जाहीर केले.

सहकाराला काळीमा फासणाऱ्या या गंभीर घटनेतील सहभागी संशयित जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आणि सोसायटीचे तत्कालीन चेअरमन अनिल देसाई, बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे यांच्यासह सर्व दोषींची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आ. सदाभाऊ खोत यांनी याविषयीची लक्षवेधी अधिवेशनादरम्यान विधानपरिषद सभागृहात मांडली. बोगस कर्जप्रकरणे थेट विधिमंडळात गाजल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

माण तालुक्‍यातील महाबळेश्वरवाडी सोसायटीतील कथित भ्रष्टाचाराबाबत बोलताना आ. सदाभाऊ खोत म्हणाले, जिल्हा बॅंक सोसायट्यांना कर्ज देते आणि पुढे सोसायट्या सभासदांना कर्ज देतात. सातारा जिल्हा बॅंकेचा कारभार मात्र आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा सुरू आहे. अनेक ठिकाणी बोगस कर्जवाटप करण्यात आले आहे. महाबळेश्वरवाडी सोसायटीत मूळ कर्जदारांची फसवणूक करण्यात आली आहे. चाळीसपेक्षा जास्त मयत सभासदांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे करण्यात आली आहेत.

पांडुरंग कोठावळे, ज्ञानू निंबाळकरांसह अनेक मयत सभासद कर्ज घ्यायला स्वर्गातून तीन तीन वेळा खाली आले आणि कर्ज घेऊन पुन्हा स्वर्गात गेले. या घटनेत खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत, तर दुसरीकडे पांढरे कपडेवाले बोगस कर्जप्रकरणे करून भ्रष्टाचार करत आहेत. तक्रारी झाल्यावर काही कर्ज भरून घेतल्याचे सांगण्यात येत आसले तरी गुन्हा घडल्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सहकार चळवळीला काळीमा फासणारी घटना महाबळेश्वरवाडी सोसायटीत घडली आहे. जिल्हा बॅंकेचे उपाध्‍यक्ष व महाबळेश्‍वरवाडी सोसायटीचे चेअरमन अनिल देसाई, सीईओ राजेंद्र सरकाळे, डीडीआर, एआर या सर्वांना हे प्रकरण माहीत आहे. या सर्वांवर एफआयआर दाखल करण्यात यावा. दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

लक्षवेधीला उत्तर देताना सहकारमंत्री पंकज भोयर म्हणाले, महाबळेश्वरवाडी सोसायटीतील घटना अतिशय गंभीर आहे. सहकाराला काळीमा फासला गेला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस सह्या करून कर्जवाटप करण्यात आले आहे. म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी काहीच केले नाही. चेअरमनच्या मयत आईच्या नावावरही कर्ज उचलण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित एआर आणि डीडीआर यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. पोलिसांनी एका आठवड्यात जिल्हा बॅंक व सोसायटी चेअरमन आणि सर्व सहभागींची याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT