कराड : महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम अर्थात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा दि.11 ऑक्टोंबर रोजी 83 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतीमित्र डॉ. संदीप डाकवे यांनी ’जंजीर’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची पिंपळपानावर सुंदर कलाकृती साकारली आहे. हे अनोखे चित्र तयार करुन त्यांनी अमिताभ यांना चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डॉ. संदीप डाकवे यांनी पिंपळ पानाचा नको असणारा भाग कापून अमिताभ यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
डॉ. संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ , वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकाने घेतली आहे. डॉ. डाकवे यांनी यापूर्वी गौतम बुध्द, आण्णा भाऊ साठे, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पिंपळ पानावर अप्रतिम चित्रे रेखाटली आहेत.