ना. शिवेंद्रराजे भोसले  Pudhari Photo
सातारा

Ambenali Ghat Accident : आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत; ना. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा

मृत युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात झालेल्या भीषण कार अपघातात सातारा जिल्ह्यातील ८ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख अशी एकूण ८ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

कोकणातून घरी परतत असताना दि. २४ मे रोजी मध्यरात्री या युवकांची कार दरीत कोसळली होती. या अपघातात आठही युवकांचा मृत्यू झाला होता. अपघातात कार चालक संदीप काटकर (वय ३५ रा. खटाव) याच्यासह आसगाव येथील आदित्य अशोक साळुंखे (वय २०), महेश अनिल पवार (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २३), अंश समीर चव्हाण (वय १८ रा. चिपळूण) असे ५ जण व मर्ढे ता. सातारा गावातील उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २२) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २३) यांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर ना. शिवेंद्रराजे यांनी मृतांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. याबाबत ना. शिवेंद्रराजे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

ना. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृताच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली. ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापगंज पेठ सातारा या शाखेच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT