कराड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कराड येथे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. या जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही मोजक्या घटनांविषयांची माहिती देणारे बॅनर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील काही प्रमुख घटना आणि घडामोडींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, कराड शहरातील विविध चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र व माहिती असलेले मोठ-मोठे फलक, निळे झेंडे लावण्यात आले असून जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
तसेच विद्युत रोषणाईने चौक सुशोभित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र घेऊन अनेकजण आज समाजामध्ये प्रबोधन करत आहेत.
त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक विचारांवरती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. ईश्वर रायण्णवर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.