सातारा : जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुतीतील मित्र पक्ष आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे शंभूराज देसाई यांनी युतीतील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावले पाहिजे. पालकमंत्र्यानी बोलावल्यावर येणार नाही, जाणार नाही असे आम्ही म्हटलेले नाही.
युतीसाठी एकत्र या, बसा, चर्चा करा अशी भूमिका पालकमंत्र्यांनीच घ्यायला हवी, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे हे काय भूमिका घेतात, काय सूचना करतात त्यानुसार आम्ही भूमिका ठरवणार आहोत. वरिष्ठांच्या सूचनेपलीकडे आम्ही जाणार नाही, असेही ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
सातारा पालिकेत ना. शिवेंद्रराजे भोसले यांची बैठक पार पाडली. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना छेडले. भाजपने मित्र पक्षांना सन्मानाने बोलवावे; अन्यथा स्वबळावर लढू, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे, याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पालकमंत्री ते असल्यामुळे त्यांनीच आम्हाला चर्चेसाठी बोलावले पाहिजे. उलट ते आम्हाला कसे सांगतात? जिल्ह्याचे ते पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले पाहिजे. पालकमंत्र्यांनी बोलावल्यावर येणार नाही, जाणार नाही असे आम्ही म्हटलेले नाही. युतीसाठी एकत्र या, बसा, चर्चा करा अशी भूमिका पालकमंत्र्यांनीच घ्यायला हवी.
जातीय पक्षासोबत जाणार नाही असे मंत्री ना. मकरंद पाटील म्हणत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आम्ही सर्वजण युतीमध्ये एक असून त्यामध्ये जातीवादी कोण आहे? भाजपमध्ये सर्व जाती-धर्माचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी आहेत. जात बघून कुणाला उमेदवारी दिलेली नाही. तसे असते तर फिरोज पठाण यांना सातारा पालिकेची उमेदवारी दिली नसती. मी पालकमंत्री असलेल्या लातूरमध्ये 7 मुस्लिम उमेदवार भाजपमधून निवडणूक लढवली. भाजप जातीवादी असता तर मुस्लिम लोकांना उमेदवारी दिली नसती. युतीचा निर्णय असल्यामुळे राज्यात वरिष्ठांनी किंवा जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत सर्वांनी एकत्र आले पाहिजे. पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलावले तर पुढील चर्चा होईल. युती होत नसेल प्रत्येकजण आपापल्या ताकदीवर लढेल. निवडणुकीतून कुणीही माघार घेणार नाही, असे ना. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
सातारा पालिका सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन्ही राजेंमध्ये वाटाघाटी झाल्या का? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही सर्व 40 नगरसेवक भाजपचे म्हणून निवडून आणले आहेत. पूर्वी दोन आघाड्या होत्या. पण नगरपालिकेत सर्वजण भाजप म्हणून आहेत. आम्ही भाजप म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आमच्यात वेगळा विषय नाही. माध्यमांनी आघाड्या आणि भाजप वेगळे असे चित्र निर्माण केले आहे. एकत्र बसून निर्णय होईल. सर्वजण एकत्रपणे काम करू, असेही ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.
सातारा पालिकेच्या पदाधिकारी निवडीत अपक्षांना संधी देणार का? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजेे म्हणाले, सभापतीपदी त्यांना लगेच संधी देता येईल की नाही हे आज सांगता येणार नाही. पण पक्षातून अधिकृत निवडून आलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे. पाच वर्षांचा कालावधी असल्याने पुढील काळात अपक्षांचा विचार करता येईल. पण निवडणूक झाल्यावर लगेच अपक्षांना संधी दिली तर पक्षाच्या अधिकृत नगरसेवकांवर अन्याय केल्यासारखे होईल. अपक्षांना सोबत घेतले असून त्यांची विकासकामेही केली जातील. पण त्यांना पुढील टप्प्यात संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्यजितसिहांना ताकद देणार
पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांना ताकद देणार का, असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सत्यजित यांनी पक्षामध्ये प्रवेश केला असून ते पदाधिकारी आहेत. सरकारकडून त्यांना आवश्यक ती मदत करणार, असेही त्यांनी सांगितले.