Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: शाहूनगरीत रंगला सारस्वतांचा मेळा Pudhari Photo
सातारा

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: शाहूनगरीत रंगला सारस्वतांचा मेळा

‘मराठी‌’च्या सांस्कृतिक स्मृतींचा अन्‌‍ साहित्यिक परंपरेचा उत्सव

पुढारी वृत्तसेवा
योगेश चौगुले

सातारा : साताऱ्याच्या मातीत पुन्हा एकदा शब्दांचे मोती उधळले जात आहेत. विचारांचे वारे वाहू लागले आहेत आणि अक्षरांची पालखी घेऊन सारस्वतांची मांदियाळी शाहूनगरीत दाखल झाली आहे. 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ एक कार्यक्रम नसून, मराठी भाषेच्या सांस्कृतिक स्मृतींचा, वैचारिक प्रवाहांचा आणि साहित्यिक परंपरेचा उत्सव आहे. तब्बल तीन दशकांनंतर साताऱ्यात भरलेला हा साहित्यिक मेळा, म्हणूनच अधिक भावनिक आणि ऐतिहासिक ठरतो आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रबोधनवादी विचारांचा वारसा लाभलेल्या या भूमीत साहित्य संमेलन भरावे, हीच एक अर्थपूर्ण घटना आहे. शाहू महाराजांनी समाजाला दिलेली समतेची, शिक्षणाची आणि मुक्त विचारांची शिकवण ही मराठी साहित्याच्या आत्म्याशी नाळ जोडणारी आहे. त्यामुळे ‌‘शाहूनगरीत भरला सारस्वतांचा मेळा‌’ हे वाक्य केवळ शीर्षक न राहता, या संमेलनाचा खरा आशय ठरतो.

चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक, लोककला, वैचारिक परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन अशा विविध साहित्यिक प्रवाहांचे दर्शन घडते आहे. ज्येष्ठ साहित्यिकांपासून ते नवोदित लेखकांपर्यंत सर्वांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. पुस्तकांच्या दालनांतून फिरताना मराठी साहित्याचा इतिहास आणि वर्तमान एकाच वेळी नजरेसमोर उभा राहतो. शब्दांवर प्रेम करणारा वाचक इथे हरवून जातो, तर लेखक नव्या प्रेरणा घेऊन पुढील प्रवासासाठी सज्ज होतो.

या संमेलनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विचारमंथन. साहित्य म्हणजे केवळ सौंदर्याचा आविष्कार नसून समाजाशी संवाद साधण्याचे साधन आहे, ही जाणीव इथल्या चर्चांतून ठळकपणे समोर येते. भाषा, अस्मिता, सामाजिक वास्तव, बदलते माध्यमविश्व, ग्रामीण-शहरी दरी, स्त्रीवादी आणि दलित साहित्याचे प्रश्न या साऱ्यांवर खुलेपणाने मते मांडली जात आहेत. मतभिन्नता आहे, वाद आहेत; पण तेच तर सशक्त साहित्यसंस्कृतीचे लक्षण आहे.

अर्थात, साहित्य संमेलन म्हणजे फक्त साहित्यिकांसाठीचा बंदिस्त कार्यक्रम नाही. साताऱ्याच्या सामान्य नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. शहराची सजावट, स्वयंसेवकांची धावपळ, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि वाचकांची गर्दी या साऱ्यांतून साहित्य अजूनही लोकांच्या जीवनाशी जोडलेले आहे, ही आश्वासक बाब अधोरेखित होते. 99 व्या संमेलनाच्या निमित्ताने पुढील शताब्दीच्या उंबरठ्यावर उभे असलेले मराठी साहित्य स्वतःकडे आरसा धरुन पाहत आहे. आपण कुठून आलो, कुठे आहोत आणि कुठे जायचे आहे हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. साताऱ्याच्या शाहूनगरीत भरलेला हा सारस्वतांचा मेळा म्हणूनच स्मरणात राहील; कारण इथे केवळ साहित्य साजरे होत नाही, तर मराठी मनाचा शोध घेतला जातो.

साहित्य हे काळाशी भिडणारे माध्यम...

आजच्या डिजिटल, झपाट्याने बदलणाऱ्या काळात साहित्य संमेलनांची गरज आहे का, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र साताऱ्यातील हे संमेलन त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः देत आहे. जेव्हा हजारो लोक शब्दांसाठी, विचारांसाठी आणि संवादासाठी एकत्र येतात, तेव्हा साहित्याची उपयुक्तता नव्याने सिद्ध होते. साहित्य हे काळाच्या बाहेर उभे नसून, काळाशी भिडणारे माध्यम आहे, याची प्रचिती या संमेलनातून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT