सातारा

Ajit Pawar | पाच पैशाचा मिंधा नसताना मला टार्गेट केलं जातंय : अजित पवार

रहिमतपूरमध्ये सुनील माने यांच्यासह पदाधिकारी राष्ट्रवादीत

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : मी कुणाच्याही पाच पैशाला मिंधा नाही. मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातंय. आता जे घडायला नको होतं ते घडलं. मी माहिती घेतली तर त्यात एक रुपयाचा व्यवहार झाला नाही. एक रुपया कुणाकडून घेतला नाही आणि कुणाला एक रुपया दिला नाही. याप्रकरणी एक कमिटी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. तिघांवर यात एफआयआर झाली आहे. जनतेची सेवा करताना कधी आरोप होतात, कधी कौतुक होते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाद पवार यांनी पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर भाष्य केले.

रहिमतपूर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला ना. मकरंद पाटील,

खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा बँक संचालक रामभाऊ लेंभे, शिवरूपराजे खर्डेकर, उदयसिंह पाटील- उंडाळकर, विक्रमबाबा पाटणकर, संभाजीराव गायकवाड, शहाजीराव क्षीरसागर, सुरेंद्र गुदगे, संजीव देसाई, राजेश पाटील-वाठारकर, डी. के. पवार, शिवाजीराव महाडिक, जितेंद्र पवार, मनोज देशमुख, पृथ्वीराज गोडसे, सीमा जाधव, बेदिल माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. अजित पवार म्हणाले, त्या जमीन व्यवहार प्रकरणाची मला काही माहितीच नव्हती. परंतु, विरोधकांनी रान उठवले. दादा सकाळी 6 वाजता कामाला लागतो ते रात्री 10-11 वाजता घरी जातो. त्यामुळे त्या प्रकरणाची मला माहिती नव्हती. माहिती घेतली असता त्यात एक रूपयाचा व्यवहार झाला नाही, एक रूपया कुणाकडून घेतला नाही आणि कुणाला एक रूपया दिला नसल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारने एक कमिटी नेमली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. तिघांवर यात एफआयआर झाली आहे. मी कुणाच्याही पाच पैशाचा मिंधा नाही. एवढं माझ काम चोख असतं. माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप झाला. 70 हजार कोटीपैकी त्यातील 100 कोटी द्या. त्यामध्ये माझ्या 10 पिढया बसून खातील. पण मला कोण दाखवना कुठं पैसे आहेत ते. धाडी टाकल्या, सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्या 22 ठिकाणी धाडी टाकल्या. त्याचा मला खूप त्रास झाला. पण मी तो सहन केला. जनतेची सेवा करताना कधी आरोप होतात, कधी कौतुक होते, कधी नाकारले जाते, असेही ना. अजितदादा म्हणाले.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची बैठक साताऱ्यात आहे. आजही चव्हाणसाहेबांचे नाव घेतले की नतमस्तक होतो. हा आदर्श ठेवूनच पुढे चाललो आहे. सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला ताकत दिली. जे पुणे जिल्ह्याने दिले नाही त्यापेक्षा साताऱ्याने राष्ट्रवादीला भरभरून दिले. त्यामुळेच साताऱ्याकडे माझं विशेष लक्ष असतं. साताऱ्याचं मेडिकल कॉलेज कसं केल आणि पैसे दिले माझे मला माहिती. तुमचे मुख्यमंत्री असताना ते झाले नाही. सैनिक स्कूलसाठी 500 कोटी मंजूर केलेत. ज्या योजना आहे त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने निधी देतो. मी दूजाभावाने वागणूक दिलेली नाही.

ते म्हणाले, सुनील माने यांनी अनेक पदांवर उत्तम काम केले. पक्षासाठी निस्वार्थ काम केले. त्यांच्यासारखा नेता जोडला जावा, अशी माझी भूमिका होती. सर्वांना वाटत होते की आपण एकत्र यावे त्यातूनच हे घडले आहे. मधल्या काळात विरोधी पक्षात असताना विकासकामांना खीळ बसली. मात्र, त्याला आता जोड द्यायची आहे. मी फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. तुम्ही ताकद दिली तर करून दाखवतो. रहिमतपूरची अनेक कामे राहून गेली. कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी मी पैसे दिले पण निकृष्ट दर्जाची कामे झाली. त्यामुळे सुनील माने यांनी उपोषण केले. सुनील माने यांना सहकार्य करा, पाठिंबा द्या. त्यांच्याकडून विकासकामे करून घेण्यासाठी अजितदादा कमी पडणार नाही.

आजपासून नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरले जाणार आहेत. चिन्ह वाटप झाल्यानंतर अवघे 6 दिवस प्रचाराला मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. याच कालावधीत जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना अलर्ट रहावे लागेल. आम्ही सत्तेत कोणासोबतही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हा माझा अजेंडा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी यापूर्वीही काम करत होतो व यापुढेही काम करत राहू, अशी ग्वाही ना. अजितदादांनी दिली.

ना. मकरंद पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा खा. शरद पवार व अजितदादांच्या पाठिशी उभा राहिला. एकेकाळी 9 आमदार व 2 खासदार राष्ट्रवादीचे होते. मात्र, गेल्या काही वर्षात हा जिल्हा यशवंत विचार, शाहु, फुले व आंबेडकर विचारांपासून दूर जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, खात्रीने सांगतो की आजचा प्रवेश राष्ट्रवादी भक्कम केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. सुनील माने, संभाजीतात्यांना सांगेन की राष्ट्रवादी पक्ष तुमचाच आहे. तुम्ही वेगळ्या घरात आला नाही. आता यापुढे हातात हात घालून राष्ट्रवादी पक्ष वाढवूया, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.

सुनील माने म्हणाले, हा स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचा जिल्हा आहे. चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. हीच परंपरा आपण जपली पाहिजे. रहिमतपूरच्या विकासासाठी काम केले. रहिमतपूरच्या विकासकामात ना. अजितदादा पवार, शालिनीताई पाटील, बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीत असताना विविध पदांवर काम केले. राष्ट्रवादीत काम करताना पक्षाचे विचार पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले. दादांच्या माध्यमातून वाडीवस्तीवरील कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका राहिल. हा जिल्हा घड्याळमय करण्याची खात्री देतो. भविष्यात दादांचा व आबांचा विचार जिल्ह्यात पोहचवण्यासाठी जी जबाबदारी द्याल ती ताकतीने पूर्ण करू, असा शब्द दिला.

पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद

अवकाळी पावसाने खूप नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्याला उभे केले पाहिजे. त्याला पॅकेज देण्यासाठी 32 हजार कोटी लागले. त्यानंतर कोकणातील शेतकऱ्यांसाठीही 8 हजार कोटी लागले. सगळी सोंग करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही. आम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्यावर विरोधक म्हणतात तुम्हाला कळत नाही का? आता मला माहित होत का असा अवकाळी पाऊस होणार आहे ते. पुढच्या अर्थसंकल्पात पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल. 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, यंदा कर्जमाफी होणार नाही, असे ना. अजित पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT