सातारा

अजित पवारांच्या दौर्‍यात राष्ट्रवादीला राजकीय टॉनिक मिळणार का?

दिनेश चोरगे

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  उपमुख्यमंत्री पदासह अनेक मंत्रिपदे भूषवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी पाटण मतदारसंघात येत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातील अजित पवारांच्या दौर्‍यामुळे राजकीय वादळ उठले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयासाठी दादा कोणते राजकीय टॉनिक देणार व मंत्री शंभूराज देसाईंचा राजकीय समाचार कसा घेणार यासह माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मूळच्या भागातच हा दौरा असल्याने ते महाविकास आघाडीची एकी साधत महायुतीवर कसे शिरसंधान साधणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सत्तेत असताना अनेकदा अजित पवार पाटणला आले आहेत. सत्तेत असल्याने विकास कामांच्या घोषणा, आश्वासने व प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी या मतदारसंघासाठी भरभरून दिले. त्याकाळात विरोधी पक्षावर बोलण्यावर त्यांनी तितकेसे लक्ष केंद्रित केले नव्हते. बहुतेकदा येथे सत्तेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. मात्र, आता मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदललेली आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीतही मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आता विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्या दौर्‍याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई सध्या पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील नेते व मित्र पक्षांबाबत अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. आपल्या खास व निर्भिड शैलीसाठी प्रसिद्ध असलेले दादा याचा समाचार कसा घेणार याची उत्सूकता राजकीय जाणकारांना लागली आहे.अजित पवार यांचा पाटण दौरा राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उर्जा देणारा ठरणार आहे. त्यामुळे या दौर्‍याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा..

सत्तेत नसले तरी अजित पवार यांच्याकडून आजही पाटण तालुक्याला प्रचंड अपेक्षा आहेत. प्रामुख्याने तालुक्यातील छोट्या, मोठ्या प्रकल्पांची रखडलेली कामे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, कोयना अभयारण्य, इको सेन्सिटिव्ह झोन आदी पर्यावरण प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांच्या जीवन हक्कांवर आलेले निर्बंध ,नियम व कडक कायदे यातून स्थानिकांना संरक्षण मिळावे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणारे शेतीचे नुकसान, पाळीव प्राण्यांसह मानवी हल्ले व ढिम्म प्रशासन याबाबतही त्यांची भूमिका काय या बाबीही महत्त्वाच्या आहेत. पर्यटन पूरक प्रकल्पांवर आलेले गंडांतर बोटिंग, मासेमारी बंदी, पवनचक्क्यांना प्रकल्पांना लागलेली घरघर, रोजगार, विकासावर आलेली कुर्‍हाड यावर दादांची भूमिका महत्त्वाची आहे. विक्रमसिंह पाटणकर यांच्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर झालेला नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत दादांकडून अपेक्षा आहेत.

पक्षाला उर्जितावस्था येण्यासाठी कोणता कानमंत्र देणार

अजित पवार यांचा दौरा राजकीय, सार्वजनिक बाबींसाठी विकासात्मक ठरणार का यावरही आगामी राजकारण अवलंबून आहे. गेल्या काही निवडणुकात राष्ट्रवादी तथा पाटणकर गटाची झालेली पिछेहाट त्यावर आवश्यक त्या उपाययोजना, यावर अजितदादा नक्की कोणता कानमंत्र देणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT