अजितदादांची राष्ट्रवादी फ्रंटफूटवर Pudhari File Photo
सातारा

अजितदादांची राष्ट्रवादी फ्रंटफूटवर

पक्षप्रवेशाची धांदल : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जोरदार ‘चाल’

पुढारी वृत्तसेवा
हरीष पाटणे

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आता पक्षप्रवेशाची धांदल दिसू लागली आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील आज ‘हाताला टाटा’ करून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेत आहेत. जिल्ह्यात ऐन उकाड्यात अजितदादांची राष्ट्रवादी फ्रंटफूटवर खेळताना दिसू लागली आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक चार आमदार व त्यातले दोन मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार त्यातले एक मंत्री आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे दोन आमदार त्यातले एक मंत्री आहेत. चार मंत्रिपदांमुळे सातार्‍यात दररोज पोलिटिकल फिव्हर वाढलेलाच दिसतोय. महायुतीचे सरकार असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:ची पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतोच. त्यातच सातारा जिल्ह्यावर यापूर्वी यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांची सत्ता राहिली आहे. प्रदीर्घ काळ सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांनी अत्यंत हुशारीने यशवंत विचार समोर ठेवत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजितदादांनी मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले, तर त्यांचेच बंधू नितीनकाका पाटील यांना राज्यसभेचे खासदार केले. राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर नितीनकाकांनी सातारा जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधली आहे. मुळातच लक्ष्मणराव पाटील यांचा गट मकरंदआबांच्या बरोबरीने टिकवून ठेवण्यात नितीनकाकांनी मेहनत घेतलीच होती. आता अजितदादांनी पक्षामार्फत खासदारकी दिल्याने नितीनकाकांचा घोडा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या सहकार्याने चौखूर उधळत आहे.

लक्ष्मणराव पाटील यांनी ज्याप्रमाणे बेरजेचे राजकारण केले तोच कित्ता गिरवत मकरंदआबा, नितीनकाका या दोघांनी अन्य पक्षांतील ताकदवान लिडर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आणून पक्ष संघटना वाढवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तहहयात काँग्रेसचा विचार घेऊन राजकारण करणार्‍या विलासकाकांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांना यशवंत विचारांचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात या दोन्ही भावांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. आज अजितदादांच्याच उपस्थितीत उदयसिंहांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय. कराड दक्षिणच्या राजकारणात त्यामुळे महायुतीतच उलथापालथ होणार आहे. दक्षिणेच्या राजकारणामुळे पुढच्या काळात महायुतीतील भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणारे उदयसिंह पाटील यांच्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो. माण-खटावमधील अनेक नेते अजितदादांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी तसे सुतोवाच केले आहेत. माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे ही मंडळीसुद्धा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीने पाय पसरायला सुरूवात केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर लागण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी रान नांगरून ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीने केलेली दिसते. एकीकडे भाजप पक्ष संघटनेत बदल करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र थेट पक्षप्रवेशाचे धडाके उडवत आहे. राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाची सुरू झालेली धांदल ऐन उकाड्यात राजकीय गरमागरमी वाढवू लागली आहे. चारही राजकीय पक्षांमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी फ्रंटफुटवर खेळताना दिसू लागली आहे. या पक्षसंघटनेला अजितदादा आज काय मंत्र देणार? याविषयी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT