सातारा : किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीवेळी अतुलनीय शौर्य, साहस आणि निष्ठेचं दर्शन घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, जीवाजी महाले यांचा प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचं काम तातडीनं पूर्ण करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन आणि इतर विषयांच्या अनुषंगाने ना. अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत ना. पवार यांनी प्रशासकीय अधिकार्यांना विविध सूचना केल्या.
प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रम केला होता. या लढ्यात वीर जीवाजी महाले यांनी चपळाईने पुढे येऊन शिवरायांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या शौर्याची इतिहासात नोंद आहे. हीच गाथा देश-विदेशातील इतिहासप्रेमी पर्यटकांनाही समजावी, या उद्देशाने हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.
दरम्यान, श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि सिंहगड किल्ला समग्र संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. श्री क्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन नवीन विकासकामे करण्यात यावी. हे करताना मंदिर आणि किल्ला परिसराचे ऐतिहासिक, प्राचीन सौंदर्य कायम राहील, याची पूर्ण काळजी घ्यावी, अशा सूचना ना. पवार यांनी दिल्या.
ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास, जिल्ह्यातील कलावंताच्या सहभागातून गायन, वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनासारख्या सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन, पर्यटकांना पर्यटनस्थळं पाहण्याचा आनंद देण्याबरोबरच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणार्या ‘मोटरबोटींग’, ‘झिपलाईन’ सारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्या, शाश्वत अशा पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचं सादरीकरण या बैठकीत करण्यात आले.