अरुण देशमुख यांच्या निधनानंतर अजितदादांनी निभावले होते अथर्वचे पालकत्व ! 
सातारा

अरुण देशमुख यांच्या निधनानंतर अजितदादांनी निभावले होते अथर्वचे पालकत्व !

अजितदादांच्या निधनानंतर अथर्वने दादांविषयी केली कृतज्ञता व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

योगेश चौगुले

सातारा : सातारा जिल्ह्यात अजितदादांनी राजकारणाच्या पलिकडे जावून मोठा मित्रपरिवार जमा केला होता. पत्रकारांच्या मित्रपरिवारातील ‌‘पुढारी‌’चे अरुण देशमुख यांच्या निधनानंतर सातारा जिल्ह्याच्या समस्त पत्रकारितेने अजितदादांकडे केलेल्या आग्रहानंतर स्व. अरुण देशमुख यांचा मुलगा अथर्व देशमुख याचे पालकत्व स्वीकारत त्याच्या शिक्षणाची फी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमार्फत करुन अजितदादांनी हे पालकत्व निभावले होते. अजितदादांच्या निधनानंतर अथर्वने दादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेशी अजितदादांचा कमालीचा स्नेह होता. अजितदादा साताऱ्याचे पालकमंत्री असल्यापासून सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्याशी अजितदादांचा असलेला जिव्हाळा सर्वश्रुत होता. ‌‘पुढारी‌’ परिवारातीलच अरुण देशमुख यांच्याशी दादांची घट्ट सलगी होती. अरुण देशमुख यांचे दि. 28 सप्टेंबर 2016 रोजी आकस्मिक निधन झाले. या निधनानंतर अजितदादांनाही दु:ख झाले होते. खंडाळ्याच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हरीश पाटणे यांनी अरुण देशमुख यांच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करण्याची मागणी जाहीरपणे केली. दादांनी व्यासपीठावरच 1 लाख रुपयांची मदत दिली. याशिवाय या क्षणापासून अथर्व अरुण देशमुख याच्या शिक्षणाची जबाबदारी विद्या प्रतिष्ठान घेईल, असे जाहीर केले. अनेक राजकीय नेते केवळ घोषणा करतात पण कृती करताना मात्र हात आखडता घेतात. अजितदादांनी मात्र विद्या प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून दरवर्षी न चुकता अथर्व देशमुखच्या शिक्षणाची फी गेली पाहिजे याची काळजी वाहिली. एवढेच नव्हे तर सातारच्या दौऱ्यात ते पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण व निवासी संपादक हरीश पाटणे यांच्याकडे अरुण देशमुख यांच्या कुटुंबाविषयी व अथर्वच्या शिक्षणाविषयी विचारपूस करायचे. सातारचे पालकमंत्री असल्यापासून जपलेला स्नेह अजितदादांनी हयातभर सांभाळत हे पालकत्वही निभावले.

अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अथर्व देशमुखनेही हंबरडा फोडला. वडील गेल्यानंतर वडीलकीच्याच नात्याने अजितदादांनी केलेली मदत अथर्व विसरला नाही. दादांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना अथर्वला भरुन आले. अजितदादांसारखा पालकमंत्री झाला नाही व अजितदादांसारखा पालकही दुसरा कोण होवू शकणार नाही, अशा शब्दात अथर्वने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

ज्याच्याशी घट्ट ऋणानुबंध आहेत त्याच्यासाठी काळ्या रात्रीलाही उभा राहणारा मित्र म्हणून अजितदादांची सातारच्या त्यांच्या खास मित्रपरिवारांमध्ये ओळख राहिली. अखेरपर्यंत त्यांनी राजकारणाच्या पलिकडे जावून ऋणानुबंध सांभाळले, मैत्री जपली. त्यामुळे अजितदादांच्या निधनानंतर साताऱ्यातील त्यांच्या मैत्रीचा हळूवार कोपराही गहिवरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT