सातारा

Ajit Pawar | घाबरू नका, असे किती आले अन्‌‍ किती गेले : ना. अजितदादा पवार

सत्तेच्या मस्तीत वागाल तर जनता खपवून घेणार नाही

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : रहिमतपूरमध्ये प्रभाग रचनेत मनमानी झाली. मतदार यादीत घोळ झाल्याच्या तक्रारी आल्या. याचा लोकशाहीला धोका आहे. पालिका निवडणुकीत कुणाला घाबरू नका. असे किती आले आणि किती गेले. कुणीच दमदाटी करण्याचं कारण नाही. समोरच्यांनीही नीट वागावे, आम्ही नीट वागतो. सत्तेची मस्ती डोक्यात घेवून वागू लागला तर जनता खपवून घेणार नाही. कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका. कुणाकडूनही होत असलेल्या दिशाभूलीला भुलू नका, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी भाजपवरच निशाणा साधला.

रहिमतपूर येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. नितीन पाटील, सुनील माने, वासुदेव माने, जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, उदयसिंह पाटील, विक्रमबाबा पाटणकर, सीमा जाधव, राजेश पाटील, शहाजी क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदना माने, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, राजेश घाडगे, अविनाश माने, रमेश माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख यांच्यासह पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.

ना. अजिदादा पवार म्हणाले, पुणे व मुंबईमध्येही मतदार यादीत दुबार नावे आली आहेत. महाराष्ट्र व देश हा राज्य घटनेनुसार चालतो. मतदार यादीत दुबार, तिबार आणि चौबार नावे हे चालणार नाही. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही. ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली ते जनतेने खपवून घेतले नाही. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ती चूक मान्य केली. मात्र, यानंतर जनतेने बदल घडवून आणला. हे सर्व घटनेमुळेच झाले. रहिमतपूर पालिका विकासाच्या वाटचालीत अग्रेसर आहे. बऱ्याचदा जुनी पिढी चांगले काम करते पण पुढील पिढी ते टिकवत नाही. परंतु, सुनील माने यांच्या वडिलांनी चांगले नेतृत्व दिले. त्यानंतर तुम्ही सुनील माने यांना संधी दिली. त्यामुळेच रहिमतपूरची विकासाची घोडदौड सुरू झाली आहे.

रहिमतपूरचे बजेट 40 ते 50 कोटी आहे. यामध्ये काहीच होत नाही. तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठिशी रहा, निधीची कमतरता भासू देणार नाही. सुनील माने यांनीही रहिमतपूरमध्ये बदल घडवला आहे. त्याचप्रमाणे नंदना माने यांना मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे. त्यांचे पती सुनील माने यांनी नगराध्यक्ष कसा असावा, हे महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. रहिमतपूरच्या प्रगतीत भविष्यात नंदना ताई मोठा वाटा उचलतील. त्यांच्या पाठिमागे अजित पवार उभा आहे.

सुनील माने म्हणाले, 25 वर्षापूर्वीचा योग आज जुळून आला आहे. त्यावेळी 17-0 असा निकाल लागला होता. त्यावेळीही आणि आजही मतदान व निकालाची तारीख एकच आहे. ना. अजितदादा यांच्यामुळेच रहिमतपूरचा विकास करू शकलो. त्यांच्यामुळेच कार्यकर्त्यांना ताकद देवू शकलो. रहिमतपूरसाठी मी जे-जे मागितले ते सर्व सर्व दादांनी दिले. ज्यांच्या माण आणि म्हसवडमध्ये 15 दिवसातून एकदा पाणी येते, ते सांगतात की आम्ही रहिमतपूरला पाणी दिले, हे हास्यास्पद आहे. रहिमतपूरात चांगले काय करता येईल, यासाठी प्रयत्न करतो. रहिमतपूरमध्ये विकासाचे पर्व सुरू करणार आहे.

नंदना माने म्हणाल्या, रहिमतपूरकरांनी आम्हाला साथ देवून शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी. सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली शहराचा 25 वर्षे शहराने घोडदौड केली आहे. आगामी काळात रहिमतपूरचा लूक बदलणार आहे.

वासुदेव माने म्हणाले, रहिमतपूरमध्ये जे राजकारण सुरू आहे ते पाहिल्यास भविष्य धोक्यात असल्याचे जाणवते. भाजपला साथ न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याची भीती दाखवली जात आहे. सुनील माने यांनी 20 वर्षात मोठे काम केले असून वरिष्ठ पातळीवर माने यांना संधी द्यावी. ही निवडणूक 21-0 केल्याशिवाय राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT