औंध : औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वीस वर्षांत औंधचा चेहरा मोहरा बदलला असून अजित पवार यांच्या अपघाती निधनाने तमाम औंधकरवासीयांना धक्का बसला आहे. औंधच्या सर्वांगीण विकासात अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता. शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक विकासासाठी दादांनी औंधकरवासीयांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे औंध ग्रामस्थ व अजित पवार यांचे एक वेगळे अतूट नाते निर्माण झाले होते.
औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी ना. अजित पवार यांच्याकडे औंध शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे 2005 साली दिली. त्याअगोदर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची 2002 साली सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लावली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून त्याकाळात खटाव तालुक्यातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला. अजित पवार यांनी औंध शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून औंध येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक सर्व त्या भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. अनेक दर्जेदार इमारतींची उभारणी केली. त्याचबरोबर औंध येथील गावातील तसेच मूळपीठ डोंगरावरील रस्ते, वीज व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. दादांनी मागील दोन वर्षांपूर्वी औंधच्या ऐतिहासिक पद्माळे व नागाळे या तळ्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
मूळपीठ डोंगरावरील श्री भवानी वस्तू संग्रहालयाच्या विस्तारित इमारतीचे कामही त्यांनी मंजूर केले आहे. त्यासाठी सुमारे 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. औंध येथील श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलचा लोकार्पण सोहळा अडीच महिन्यापूर्वी अजितदादांच्या हस्ते पार पडला. यावेळी तब्बल सहा तास अजितदादा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. त्याचवेळी त्यांनी औंध येथील शास्त्रीय संगीत महोत्सवाची दखल घेत त्यासाठी आवश्यक ऑडिटोरियम उपलब्ध करून दिले. नुकत्याच पार पडलेल्या श्री यमाई देवी रथोत्सवास वेळ नसताना ही पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून अजित पवार यांनी श्री यमाई देवीचे पूजन केले. तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली होती. या आठवणी ताज्या असतानाच अजितदादा यांच्या सारखे धडाडीचे तडफदार, सर्वसामान्य जनतेची नस जाणणारे नेतृत्व आकस्मिकपणे गेल्याने औंधसह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.