सातारा : विना सहकार नाही उध्दार या ब्रीदवाक्यातून राज्यात सहकार क्रांती झाली. राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी त्या- त्या भागातील लोकांचे आणि प्राधान्याने शेतकर्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले. सहकारी साखर कारखानदारीत आमूलाग्र बदल घडत असून सातार्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने शेतकर्यांना आर्थिक सक्षम केले आहे. आदर्शवत काम करणार्या अजिंक्यतारा कारखान्याने सहकार क्षेत्राचा नावलौकिक वाढवला, असे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी काढले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांचा ‘तांत्रिक कार्यक्षमेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अजिंक्यतारा कारखान्यास मिळाला. या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. हर्षवर्धन पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील उपस्थित होते.
अजिंक्यतारा कारखान्याला मिळालेला पुरस्कार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. शिवेंद्रराजे, चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा.चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते व संचालकांनी स्वीकारला. ना. शिवेंद्रराजेंच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम 2023- 24 मध्ये साखर तयार करण्यासाठी लागणार्या वाफेचा वापर, वीजेचा वापर, गाळप क्षमता वापर, साखर उतारा इ. तांत्रिक बाबीं मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट यांचा प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार कारखान्यास मिळाल्याची माहिती जिवाजी मोहिते यांनी दिली.