पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा धनादेश ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सुपूर्त करताना पदाधिकारी. Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | शेतकरी हित जोपासण्यात ‘अजिंक्यतारा’ अग्रेसर : ना. शिवेंद्रराजे

दिवाळीपूर्वी प्रतिटन आणखी 100 रुपये देणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. कारखान्याने गत हंगामात ऊसाला 3200 रुपये प्रतिटन दिले आहे. या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी 100 रुपये शेतकर्‍यांना देऊन शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच कामगारांना 19 टक्के बोनस देणार असल्याचे जाहीर करून शेतकरी हित जोपासण्यात अजिंक्यतारा कारखाना कायम अग्रेसर राहील, असे प्रतिपादन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

शेंद्रे ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची 43 वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी- माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालक सौ. कांचन साळुंखे, सुरेश सावंत उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा भागात अति पाऊस आणि पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार ठोस पावले उचलत आहे. मी पालकमंत्री असलेल्या लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी 244 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.

व्हा. चेअरमन सावंत यांनी सूत्रसंचालन केले. माजी व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी आभार मानले. सभेला किरण साबळे- पाटील, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दादा शेळके, लालासाहेब पवार, विक्रम पवार, रामभाऊ जगदाळे, सुनील काटे, राजेंद्र यादव, धनाजी शेडगे, रवी, कदम, चंद्रकांत घोरपडे, उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, सुरेश टिळेकर, गणपत मोहिते, गणपत शिंदे, मधुकर पवार, विजय पोतेकर, पद्मसिंह फडतरे, दिलीप शेडगे, सयाजी कदम उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 10 लाखाची मदत

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारच्या आवाहनानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून अजिंक्यतारा कारखान्याने 10 लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. त्याचा धनादेश कारखान्याच्या संचालक मंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सुपूर्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT