सातारा: कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यामुळे आयुष्य संपवण्यासाठी थेट अजिंक्यतारा किल्ला गाठलेल्या एका युवकाला सातारा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवीन जीवनदान मिळाले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत सुमारे अर्धा तास युवकाची समजूत काढली आणि त्याला सुखरूप ताब्यात घेतले. या घटनेमुळे एका कुटुंबावर ओढवणारे संकट टळले असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सातारा शहर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून माहिती मिळाली की, अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजा जवळील कड्यावर एक तरुण जीवन संपवण्याचा उद्देशाने थांबला आहे. माहितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी पीसीआर व्हॅन, बीट मार्शल आणि गुन्हे शोध पथकासह (डीबी) १५ हून अधिक पोलिसांचे पथक अजिंक्यताऱ्याकडे रवाना केले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डीबी पथकही मदतीसाठी पोहोचले.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक तरुण किल्ल्याच्या धोकादायक कड्यावर बसलेला दिसला. पोलीस आणि काही स्थानिक नागरिक त्याला आवाज देऊन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. सुमारे अर्धा तास समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असताना, पोलीस कर्मचारी अनिकेत बनकर आणि महिला पोलीस स्नेहल महाडिक यांनी युवकाचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधली आणि अत्यंत शिताफीने त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी आणले.
पोलिसांनी त्याला शांत करून त्याचे समुपदेशन केले असता, पत्नीसोबत झालेल्या भांडणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि युवकाला त्यांच्या स्वाधीन केले. सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका युवकाचा जीव वाचला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोणत्याही तणावातून जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता संवाद साधावा किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.