कराड : अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणार्या कराडच्या लेकीसह जावयाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी याबाबतची माहिती कराडमधील नातेवाईकांना देण्यात आली असून, या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गौरव ब्रह्मभट आणि कल्याणी ब्रह्मभट असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे.
कराडची लेक कल्याणी यांचा विवाह गांधीनगर (गुजरात) येथील गौरव यांच्याशी 2007 साली झाला होता. गौरव ज्या कंपनीत नोकरीस होते, त्या कंपनीचे मुख्यालय लंडनला आहे. त्यामुळे वर्षातून एक ते दोन वेळा त्यांना कंपनीच्या लंडनमधील मुख्यालयात जावे लागत होते. गुरुवारी ते मुख्यालयात जाण्यासाठीच एअर इंडियाच्या 787 ड्रीमलायनर या विमानातून प्रवास करत होते. मात्र दुर्दैवाने विमानातील अन्य 241 प्रवाशांसोबत काळाने त्यांच्यावर घाला घातला. गुरुवारी दुपारी नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली.
ब्रह्मभट दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलांना घेऊन ते दरवर्षी कराडला येत असत. यावर्षी एप्रिल महिन्यात ते कराडला आले होते. आता मुलांना केवळ गौरव यांच्या आई-वडिलांचा आधार असल्याचे सुधीर ढवळेकर या त्यांच्या नातेवाईकांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.