वडूज: येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. नितीन पाटील, समोर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते. File Photo
सातारा

दूरदृष्टी समोर ठेवून राजकीय भूमिका घ्या

खा. नितीन पाटील यांचे वडूज येथे कार्यकर्त्यांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कलेढोण : लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीच्या भूमिका घेतल्या. अजूनही कार्यकर्त्यांत द्विधा मनःस्थिती आहे. काही शरद पवार गटात, तर काही अन्य ठिकाणी अडकले आहेत. मात्र, आता कार्यकर्त्यांनी दूरदृष्टी समोर ठेवून राजकीय भूमिका घ्यावी, असे आवाहन खा. नितीन पाटील यांनी केले.

मायणी अर्बन बँकेच्या वडूज शाखेच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ व कार्यकर्ता मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादी खटाव तालुका माजी अध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, जितेंद्र पवार, जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय पवार, संचालक गिरीश शहा, संकेत म्हमाणे, स्वप्निल घाडगे उपस्थित होते.

खा. पाटील म्हणाले, केवळ तत्त्वे, विचारावर कोणतीही संघटना चालत नाही व वाढत नाही. त्या जोडीला विकासकामांची जोड हवी असते. हे लक्षात घेऊन आपले नेते अजित पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आपण आज महायुतीमध्ये आहोत. म्हणूनच आपण किसन वीर सातारा, खंडाळ्यासह तीन कारखाने वाचवू शकलो. महायुतीमुळे आपल्याला 467 कोटी रुपयांची मदत झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी आम्ही पूर्ण तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. त्याचप्रमाणे तुम्हीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी, शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी विक्रमी करून संघटना मजबूत करायला हवी. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत.

सुरेंद्र गुदगे म्हणाले, खटाव तालुका पवारांच्या विचारांचा तालुका आहे. शरद पवार हे दैवत असून अजित पवार कामाचा माणूस व स्पष्ट वक्ते आहेत. सध्या कार्यकर्त्यांनी व्यवहारिक भूमिका म्हणून खटाव तालुका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी उभा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. परंतु खा. नितीन पाटील यांनीही लक्ष्मणतात्यांप्रमाणे आम्हाला ताकद देताना कमी पडू नये. युतीचा धर्म जरुर पाळा पण आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही एवढी माफक अपेक्षा आमची राहणार आहे. त्याची जबाबदारी खा. नितीन पाटील व मंत्री मकरंद पाटील या दोघांनीही घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT