कराड : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांवर विविध शासकीय उपक्रम, सर्वेक्षणे आणि ऑनलाईन नोंदींचा वाढता बोजा पडत आहे. त्यामुळे शिक्षकांचे अध्यापनाचे मूळ कार्य बाजूला राहून दिवसाचा अधिक वेळ माहिती भरणे, अहवाल सादर करणे आणि विविध मोहिमांमध्ये सहभागी होणे यावर खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याबाबत शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षकांनीही खंत व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात बहुतेक शाळांमध्ये शिक्षक अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये अधिक गुुुंतलेले पहायला मिळत आहेत. शाळेचा परिपाठ संपताच वर्गावर जाण्याऐवजी शिक्षक यू-डायस माहिती भरणे, आधार लिंकिंग, आभा कार्ड नोंदणी, शिष्यवृत्ती माहिती, शाळाबाह्य व निरक्षर सर्वेक्षण, मतदान जनजागृती, स्वच्छता अभियान, तंबाखूमुक्त शपथ, पोषण आहार अहवाल, ऑनलाईन हजेरी, फोटो अपलोड आदी कामांत गुंतवले जातात. निवडणूक काळात बीएलओची जबाबदारीही शिक्षकांवर सोपवली जाते. परिणामी, अध्यापनासाठी आवश्यक नियोजन, स्वअभ्यास आणि विद्यार्थ्यांशी संवाद यासाठी पुरेसा वेळच उरत नसल्याची तक्रार आहे.
उपक्रमांच्या भडीमारामुळे शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. मुलांना आम्ही कधी शिकवणार, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या दृष्टीने विविध योजना आणि उपक्रम राबविणे आवश्यक असले, तरी त्याची अंमलबजावणी शिक्षकांवर केंद्रित राहिल्याने शिक्षण प्रक्रियेत विस्कळीतपणा येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, गुणवत्तावाढ साधायची असल्यास शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ, प्रशिक्षण आणि साधनसामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अतिरिक्त कामांसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अधिकारी मिटिंग, अहवालात व्यस्त...
सातारा जिल्ह्यात बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा आहे. गटशिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी बैठका, ऑनलाईन मिटिंग आणि वरिष्ठांच्या आदेशांचा पाठपुरावा करण्यात व्यस्त असतात. शासनाचे अचानक ऑनलाईन पडणारे आदेश आणि तातडीची माहिती गोळा करताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असते. याचा अप्रत्य परिणामही होत आहे.