सातारा

Satara News: ठेकेदारांवर कारवाईसाठी प्रशासनाची धावपळ; ‘पुढारी’च्या दणक्यानंतर झेडपीत खळबळ

घोटाळ्यानंतर आले शहाणपण

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागात झालेला घोटाळा दैनिक ‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली. ठेकेदाराने केलेल्या करामतीमुळे पूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. घोटाळा समोर आल्यानंतर कागदोपत्री घोडे नाचवून ठेकेदारावरील कारवाईसाठी धावपळ सुरु झाली आहे. ‘पुढारी’च्या दणक्यानंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेच्या चलनांची कसून तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाखळीमध्ये आणखी कोण कोण आहेत हे आता समोर येणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील लघू पाटबंधारे विभागाच्या कंत्राटी कामांमध्ये ८ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे दैनिक ‘पुढारी’ने प्रकाशझोतात आणले. संबंधित कामे मिळवताना ठेकेदाराने अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेची बनावट चलने सादर करुन जिल्हा बँकेसह जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. हा प्रकार दैनिक ‘पुढारी’ने समाेर आणल्यानंतर तो ठेकेदार कोण? याची तपासणी आता सुरू झाली आहे. हा प्रकार लघु पाटबंधारे विभागात घडला असला तरी इतर विभागांमध्ये असे प्रकार घडले आहेत का? याची चाचपणी आता केली जात आहे. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सर्व विभागांना पत्रव्यवहार करत अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेची चलने तपासा आणि त्यामध्ये बोगसगिरी आढळल्यास कारवाई करा, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

यामुळे लघु पाटबंधारे, बांधकाम दक्षिण व उत्तर, ग्रामीण पाणी पुरवठा, समाजकल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, पाणी व स्वच्छता विभाग यासह अन्य विभागातील कर्मचारी चलनांची तपासणी करण्यात व्यस्त झाले आहेत. एकीकडे प्रशासन म्हणून सिईओंनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

लोकप्रतिनिधी म्हणून जि.प. उपाध्यक्ष राजू भोसले यांनी या प्रकरणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. हा प्रकार कसा घडला ? यामध्ये कोण कोण सामील आहे. याचा शोध घ्या आणि संबंधितावर कारवाई करा. शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशा सूचनाही राजू भोसले यांनी दिल्या आहेत. या घोटाळ्यामुळे दिवसभर झेडपीतील वातावरण तणावपूर्ण होते. तर लघू पाटबंधारे विभागात शुकशुकाट जाणवत होता. रजेवर गेलेल्‍या अधिकार्‍यांनी दुसऱ्या दिवशी झेडपीत दाखल होत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची भेटही घेतली. तसेच या घोटाळ्याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही चर्चा रंगली होती. तर कामानिमित्त आलेले ठेकेदारही विविध विभागात आपण दिलेले चलन बरोबर आहे का? याची खातरजमा करताना दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT