लोणंद शहरातून पालखी जाणार्‍या मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करून मुजवण्यात येत आहेत. Pudhari Photo
सातारा

Ashadhi Wari 2025 | माऊलींच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी

पाडेगावात मंडप उभारणी पूर्ण : 4 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा
शशिकांत जाधव

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवार, दि. 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे.

माऊलींच्या सोहळ्याचा पहिला मुक्काम लोणंद येथे होणार आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व विभाग अंग झटकून काम करत आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींच्या स्वागताची तयारी जोरदारपणे करण्यात येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर पाडेगाव येथे स्वागत केले जाते. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मंडप उभारून स्वागताची तयारी करण्यात येत आहे. पालखी विसावा, पालखी तळावरील झाडेझुडपे काढण्याबाबत संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरु आहे. पालखी महामार्गावरील खड्डे, साईडपट्ट्या तसेच पालखी तळावर मुरुम/खच टाकून रोलिंग केले जात आहे. पालखी विसावा चबुतर्‍याचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच पालखी विसावा व पालखी तळाकडे जाणारे अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम झेडपीच्या बांधकाम विभागाकडून केले जात आहे. शौचालय उभारणी ठिकाण व संख्या तसेच मैला गाळ व्यवस्थापन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये पालखीचे लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे एकूण 4 मुक्काम आहेत. पालखी सोबत असणार्‍या वारकर्‍यांचा विचार करुन फिरत्या शौचालयांचे नियोजन केलेले आहे. या सेवेचे संनियंत्रण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्ती (ठिकाण निहाय) आदेश काढले जात आहे. तसेच पाण्याचे स्त्रोत व पाण्याचे टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित केली जात आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी आपला दवाखाना स्थिर वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहे. महामार्गालगत खासगी हॉस्पिटलमध्ये 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने - हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, निवारा गृहे, पिण्याचे पाण्याची सुविधा, निवास सुविधा, महिला मदत व मार्गदर्शन कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे.

पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणी केली जात आहे. खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी आदेश काढणेत आलेले आहेत. पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतुक बंद ठेवणेबाबत आदेश काढणेत आलेले आहेत.

लोणंद मुक्कामी गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गृह विभागाकडून आवश्यक पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, आणि गृह विभाग या विभागातील सर्व मिळून 4 हजारांपेक्षा अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणंद नगरपंचायतीच्या वतीने कचरा संकलन, पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण, फिरते शौचालय ठिकाण, भाविकांसाठी सोयी सुविधा दर्शवणारा नकाशा लावण्यात येत आहे.

एका गुगल लिंकवर मिळणार सुविधांची माहिती

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना शौचालय, पाणी, आरोग्य सेवा, महिला स्नानगृहे, निवास, मुक्काम, पेट्रोल पंप आणि संपर्क यांची गावानुसार माहिती व थेट गुगल मॅप लिंक देण्यात आली आहे. या मॅपवर जाऊन वारकरी व भाविकांना विविध प्रकारच्या सोयी कुठे आहेत, याची माहिती मिळणार आहे. ही गुगल लिंक जास्तीत जास्त वारकरी व भाविकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT