सातारा : जिल्ह्यातील शालेय पोषण आहार विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडून शाळा व विद्यालयांना मलिद्यांची फर्माईश होत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारत मलईदार अधिकारी व कर्मचार्यांना नोटीसा बजावण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.
सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र शालेय पोषण विभागातील अधिक्षक व केंद्रप्रमुख तपासणीच्या नावाखाली शाळेच्या मुख्याध्यापक व शालेय पोषण विभागाच्या शिक्षकांना धारेवर धरण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. या अधिकारी व कर्मचार्यांकडून मलिद्याची फर्माईश होत आहे. स्टेशनरी साहित्य, जेवण व पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात अधिकारी व कर्मचार्यांचेच पोषण होत असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिध्द केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. शाळा तपासणीसाठी गेलेल्या अधीक्षक व केंद्रप्रमुखांची सकाळपासूनच शिक्षकांना फोनाफोनी सुरू झाली. वरिष्ठ अधिकार्यांनी तालुकास्तरावर शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना फोन करुन याबाबतची खात्री करुन घेतली.
शाळा-विद्यालयात असे प्रकार पुन्हा होवू नयेत यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना नोटीसीद्वारे समज देण्यात आली आहे. तसेच शाळा व शिक्षकांकडे अशी काही मागणी झाल्यास त्यांनी त्वरित शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करावी. त्याचबरोबर अधिकार्यांकडून असे प्रकार घडल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली. दैनिक ‘पुढारी’ने पोषण आहारातील गैरप्रकाराला वाचा फोडल्यामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.