सातारा

सातारा : औंधचा सपोनि, सहा. फौजदार ‘जाळ्यात’; लाखाची लाच घेताना ‘एसीबी’ची कारवाई

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अवैध दारू वाहतूक प्रकरणात मदत करण्यासाठी व पुढे कोणताही त्रास होणार नाही, यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी औंध पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार (एएसआय) बापूसाहेब नारायण जाधव (वय 54) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात औंध पोलिस ठाण्याचा कारभारी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे यानेही लाचेची मागणी केली असून, दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एकाचवेळी दोन पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई झाल्याने सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सपोनि दराडे पसार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे 42 वर्षांचे असून, त्यांचा परमिट रूम बार आहे. दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारवाई प्रकरणात तक्रारदार हे सपोनि दत्तात्रय दराडे व सहायक फौजदार बापू जाधव याला भेटले. यावेळी दोन्ही संशयितांनी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच इथून पुढे त्यांच्या व्यवसायात कोणताही त्रास न देण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी केल्याने बारमालक तक्रारदारांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार दिली. पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या पडताळणीमध्ये दराडे व जाधव या दोघांनी पैशांची मागणी केल्यहाचे लक्षात आले. लाचेची रक्कम शुक्रवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने ट्रॅप लावला. लाचेची रक्कम सहाय्यक फौजदार जाधव याच्याकडे देण्याचे ठरले. औंध येथील जुन्या एसटी स्टॅन्ड परिसरातील पटांगणामध्ये जाधवने दुपारी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती औंधसह परिसरात पसरल्यानंतर खळबळ उडाली.

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने औंधचे प्रभारी दत्तात्रय दराडे याच्याकडे मोर्चा वळवला असता ते नाट्यमयरित्या गायब झाले.
एसीबीने कारवाईला सुरुवात केल्यानंतर जिल्हा पोलिस दलात याची माहिती वार्‍यासारखी पसरली. एसीबीने पंचनामा करुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निलेश चव्हाण, तुषार भोसले, निलेश येवले यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'दाजी' हे वागणं बरं न्हवं…

सहायक फौजदार बापू जाधव याची फिरून-फिरून औंध पोलिस ठाण्यात अनेकदा बदली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुमारे 3 ते 4 वेळा तिथेच त्याने बदली केली असून, औंध परिसरात त्याने बस्तान मांडले आहे. तो पोलिस कमी आणि 'दाजी' म्हणून परिसरात परिचित आहे. पोलिस ठाण्यापर्यंत भानगड आली असेल किंवा भानगड येणार असेल, तर 'दाजीला भेटा आणि टेन्शन विसरा,' असाच काहीसा रुतबा होता. पोलिस ठाण्यांतर्गत बहुतेक बीटांमध्ये ढवळाढवळ होत होती. शुक्रवारी 'दाजी' ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर औंधमध्ये खुशीचा माहोल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT