सातारा : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दि. 26 जून रोजी येत असल्याने प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खंडाळा व फलटण तालुक्यातील पालखी मार्गावर वारकर्यांसाठी 43 हून अधिक ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अंगणवाड्यांमध्ये महिला वारकरी मुक्कामी राहणार असून 17 ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते 30 जून असा मार्गक्रमण करणार आहे. जिल्ह्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन केले आहे. पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा पिंपरे खुर्द, दत्त मंदिर काळज, सुरवडी, विडणी तर दुपारचा विसावा निरा, लोणंद चांदोबाचा लिंब, वडजल, निंबळक फाटा येथे होणार आहे. तर मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे होणार आहे.
वारकर्यांसाठी 43 ठिकाणी तात्पुरता विसावा व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 43 अंगणवाड्या असून एका अंगणवाडीमध्ये 20 ते 25 महिलांची निवासाची सोय करण्यात आली आहे. 43 अंगणवाड्यांमध्ये 1 हजार 75 महिलांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 17 ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पालखी मुक्कामावेळी लोणंद येथे 9 जि.प. शाळा, तरडगाव येथे 9, फलटण येथे 4, बरड येथे 2 अशा मिळून 24 प्राथमिक शाळा वारकर्यांच्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावर 43 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 43 ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन सुविधा, 43 शौचालय युनिटची संख्या उभारली आहे. सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशिन 19 तर सॅनेटरी नॅपकिन बर्निंग मशिन 23 ठिकाणी लावण्यात येणार आहेत. हिरकणी कक्षासाठी 30 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शौचालय युनिटच्या देखभालीसाठी 82 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 17 ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये गरोदर, स्तनदा माता यांच्यासाठी विश्रांती व स्तनपानाची सोय करण्यात आली आहे. पाळणा, खेळणी, स्तनपान विषयक माहितीदर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.-याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी
पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होत असतात. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांची माहिती मिळावी यासाठी हिरकणी कक्ष, निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे ठिकठिकाणी जनजागृती फलक लावण्यात येणार आहेत.