सातारा

सातारा : जिल्ह्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात मराठा समाज व इतर खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे 6 हजार प्रगणक नेमण्यात आले आहेत. सर्वेक्षणात 182 प्रश्न विचारले जाणार असून दि. 31 रोजीपर्यंत कामकाज चालणार आहे. सर्व्हेतील माहितीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने राज्य शासनाने सवेर्र्क्षणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन असून, ते वापरण्याचे प्रशिक्षण आयोगामार्फत देण्यात आले होते. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे नोडल अफिसर आहेत. एक उपजिल्हाधिकारी हे सहायक नोडल ऑफिसर आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल ऑफिसर तर नायब तहसीलदार हे सहायक नोडल ऑफिसर आहेत. हे दोघेही शहरी तसेच ग्रामीण भागासाठी काम पाहणार आहेत. सर्वेक्षणासाठी आवश्यकतेनुसार तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगवाडी शिक्षिका व इतर शासकीय 7 हजार प्रगणक-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणावेळी प्रगणकांकडून 182 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्या प्रश्नावलीमध्ये मूलभूत माहिती, कौटुंबिक प्रश्न, आर्थिक व सामाजिक स्थिती, आरोग्यविषयक माहितीसंबंधित प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून द्यायचे आहेत. ही प्रश्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे.

अशी आहे कर्मचारी संख्या
मराठा समाजाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 22 नोडल अधिकारी, 26 प्रशिक्षक, 408 पर्यवेक्षक, 5 हजार 850 प्रगणक असे सर्व मिळून 6 हजार 306 कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. फलटण आणि कराड तालुक्यात कर्मचार्‍यांची सर्वाधिक संख्या आहे. या तालुक्यात अनुक्रमे 938 आणि 1 हजार 88 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT