A beautiful picture taken for installation in the Chhatrapati Shivaji Museum.
सातारा : छत्रपती शिवाजी संग्रहालयात लावण्यासाठी काढण्यात आलेले सुंदर चित्र. Pudhari Photo
सातारा

छत्रपती शिवरायांचे चित्र अवतरणार राजधानीच्या संग्रहालयात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

पहाटे स्वप्न पडते ते सत्य होते असे म्हणतात. याचा प्रत्यय एका तरुण चित्रकाराला आला आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी स्वप्नात आलेल्या दृष्टांत चित्ररूपाने मांडण्याचा प्रयत्न नुने, ता. सातारा येथील प्रख्यात चित्रकार प्रमोद कुर्लेकर यांनी केला आहे. स्वराज्य संकल्पनेचे हे चित्र म्हणजे मूर्त स्वरूप आहे. लवकरच हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात लावण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी संग्रहालयात प्रदर्शित होणारे हे चित्र 7 फूट बाय 8 फूट अशा भव्य आकारात चितारण्यात आले आहे. या कलाकृतीची मांडणी चित्रकाराने दिव्याच्या आकाराची केली आहे. दिव्याची ज्योत म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज असून पणतीच्या आकारामध्ये स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब यांच्यासमवेत स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळातील निष्ठावान मावळ्यांचे प्रतीक चित्रकार कुर्लेकर यांनी अप्रतिम रेखाटले आहे.

स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाच्या संजीवनी माचीच्या दिशेने सूर्याकडे पाहणारे युद्धाच्या आवेशातील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांची राजमुद्रा यामुळे हे चित्र अत्यंत देखणे दिसत आहे. या चित्रामध्ये रेखाटलेली सात प्रतीके ही छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याची प्रतीके आहेत.

या चित्रात अष्टप्रधान मंडळातील पेशवे, सरसेनापती ते निष्ठावान मावळा चित्रकाराने रेखाटला आहे. या चित्राला खलित्याच्या आकाराची अत्यंत देखणी अशी फ्रेम लावण्यात आली असल्याने त्याच्या सुंदरतेत आणखी भर पडली आहे. लवकरच हे शिवस्वराज्याचे प्रतीक असलेले चित्र राजधानीतील शिवाजी संग्रहालयाची शोभा वाढवणार आहे.

SCROLL FOR NEXT