पुणे-सातारा महामार्गाची चालण Pudhari Photo
सातारा

महामार्गावर खड्ड्यांची रास; चालकांच्या खिशाला चाट

खड्डे चुकवताना वाहनधारक बेजार : महामार्ग प्राधिकरणाच्या डुलक्या

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सागर गुजर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे पाठदुखी आाणि अन्य व्याधीबरोबरच वाहनांचेही नुकसान होत आहे. वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील बहुतांश गॅरेज वाहन दुरुस्तीसाठी फुल्ल झाली आहेत. तर आधीच महागाईने वैतागलेल्या नागरिकांना निष्कारण हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाऊस सुरू असल्याने खड्डे पाण्याने भरतात. त्यामुळे खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात आदळून दुचाकीचे नुकसान होते. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असल्याने महामार्ग प्राधिकरणाकडून खड्डे भरायला सुरुवात करायला हवी होती. मात्र, अजूनही हे काम सुरु झालेले पहायला मिळत नाही.

गाड्यांसोबतच शरीराचे पार्टही व्याधिग्रस्त

पूर्वी वयोमानापरत्वे सांध्यांची झीज होत असल्यामुळे उद्भवणार्‍या या व्याधीचे आता तरुणही बळी पडत आहेत. वजन वाढणे, खांदे, पाठ, कंबरदुखीसारख्या व्याधींनी डोके वर काढले आहे. पाठदुखीणे हैराण असलेल्या नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.

गॅरेजवाल्यांना काम सरेना

खड्ड्यांमध्ये वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे गॅरेजवाल्यांना काम सरेना अन वाहनधारकांच्या खिशात पैसे उरेनात असे चित्र पहायला मिळते आहे. खड्ड्यात वाहने आदळल्याने महिन्यातून किमान एकदा वाहन गॅरेजमध्ये नेण्याची वेळ येत आहे.

पूर्वी आठवडाभरातून एक दुचाकी दुरुस्तीला यायची. आता रोज दोन ते तीन दुचाकी दुरुस्तीसाठी येतात. खड्ड्यांमुळे फोर्कआउट, बेरिंग खराब अशा समस्या वाढलेल्या आहेत.
- आमिर शेख, गॅरेज चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT