पुढारी ऑनलाईन डेस्क: 26/11 Mumbai attack | 26/11 attack |मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी भयानक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसातील उपनिरीक्षक, अशोक चक्र पुरस्कार विजेते तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी शहिद झाले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने म्हत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने ओंबळे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त 'ANI'ने दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हे स्मारक तुकाराम ओंबळे यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील केडांबे येथे बांधले जाईल. यासाठी १३.४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या मंजूर रकमेचा पहिला हप्ता, २.७० कोटी रुपये (२०%) शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही स्पष्ट केले आहे.
26/11 हल्ला (26/11 Attack) म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेला भयानक दहशतवादी हल्ला. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Taiba) घडवून आणला होता. या हल्ला भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि समन्वित दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानले जातो. दहशतवाद्यांनी कराची (पाकिस्तान) येथून एक बोट (MV Kuber) हायजॅक करून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर प्रवेश केला. प्रत्येक दहशतवाद्याला अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके आणि जीपीएस उपकरणे पुरवण्यात आली होती. कसाब आणि इस्माईल खान यांनी सर्वप्रथम CST स्थानकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये अनेक पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. अजमल कसाब (एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी) याला CST स्थानकावर पकडण्यात आले. या हल्ल्यात एकूण 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यावेळी अनेक पोलीस आणि सुरक्षादलातील जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले. यामध्ये ATS प्रमुख हेमंत करकरे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे हे शहीद झाले. 26/11 च्या हल्ल्याच्या स्मरणार्थ मुंबईत पोलीस स्मारक उभारण्यात आले आहे.