सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण बॅकवॉटरवरील पर्यटन विकासाला चालना देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय गोपनीयता कायदा 1923 मध्ये राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. त्यामुळे कोयना जलपर्यटनाला हिरवा कंदील मिळाला असून, लवकरच वॉटर स्पोर्टस् व इतर पर्यटनानुषंगिक कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी त्यामुळे उपलब्ध झाली आहे.
शासकीय गोपनीयता कायद्यातील सुधारणेमुळे आजूबाजूच्या 7 कि.मी.पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरित जलाशयाचा 80 कि.मी.चा परिसर पर्यटनद़ृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जलपर्यटनात मोठी झेप घेणार आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मदतीने जलपर्यटनाचा आराखडा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तयार केला होता. जलपर्यटनाच्या द़ृष्टीने देशातील प्रत्येक ठिकाणी असलेल्या उत्तम बाबींचा समावेश त्यांनी या आराखड्यात समावेश केला होता. हा जलपर्यटन आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. मात्र, कोयना धरण हा सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत संवेनशील भाग असल्याने त्याला गृह खात्याच्या परवानगीची आवश्यकता होती. त्याद़ृष्टीने शासकीय गोपनीयता कायद्यामध्ये बदल करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जितेंद्र डुडी यांनी याचा पाठपुरावा केला. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना जलपर्यटनाला चालना मिळावी, याद़ृष्टीने प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून तापोळा व परिसरात पर्यटनाच्यादृष्टीने कामे करण्यात येत आहेत.
जलपर्यटनाचा विषय मार्गी लावण्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान आहे. धरण क्षेत्राच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या 7 कि.मी. नंतरच्या 2 कि.मी. क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यापलिकडे जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जलपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी 47 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सातारा व जावली या तालुक्यांमध्ये पर्यटन वाढीस लागावे, यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले पाठपुरावा करत आहेत. कोयना जलपर्यटन हे बॅकवॉटरवर मुनावळे (ता. जावली) येथे करण्यात येत असल्यामुळे कोयना जलपर्यटन हा प्रकल्प आ. शिवेंद्रराजे यांच्या द़ृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहिला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची जोड या प्रकल्पाला मिळाली. सध्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचीही तेवढीच महत्त्वाची साथ लाभल्याने कोयना जलपर्यटन प्रकल्प मार्गी लागत आहे.