नागठाणेत ठेकेदाराने केला मजुराचा खून file photo
सातारा

सातारा : नागठाणेत ठेकेदाराने केला मजुराचा खून

पुढारी वृत्तसेवा

नागठाणे, ता. सातारा येथे जेवण बनवले नाही, या कारणावरून एका ठेकेदाराने मजुराचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित ठेकेदाराला अटक केली आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. निर्मित रामनरेश पटेल (वय 24, रा. ख्वाजाफुल ता. सिकंदरा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय बाबू राजपूत (वय 20, रा. आमगाव झाशी, उत्तर प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.

सध्या सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. नागठाणे येथे सुरू असलेल्या कामावर संशयित अजय राजपूत हा ठेकेदार आहे, तर निर्मित पटेल हा मजूर आहे. निर्मित हा राजपूत याच्याकडे एक महिन्यापासून सेंट्रिंग कामासाठी आला होता. गुरुवारी रात्री काम झाल्यानंतर निर्मित याला एकट्याने मटेरियल भरलेली गाडी खाली करावी लागली होती. तसेच निर्मित याने अजय याच्यासाठी जेवण बनवले नव्हते. या कारणांवरून दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले.

या रागातूनच अजयने निर्मितच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये निर्मित हा जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर संशयित अजय राजपूत हा पसार झाला. सकाळी कंपनीचे सुपरवायझर विठ्ठल साळुंखे हे पेट्रोलिंग करण्यासाठी आले. यावेळी त्यांना निर्मित याचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, सपोनि रवींद्र तेलतुंबडे, डीबीचे प्रशांत चव्हाण, केतन जाधव, अमोल गवळी, बाळासाहेब जानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली. यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे अजय राजपूत याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT