सातारा : सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य परंपरेला न्याय देत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 99 वे पर्व सातार्यात भरावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी सातार्याला भेट दिली. या समितीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात होण्याची शक्यता असून याबाबतची घोषणा आज पुण्यात होण्याची चिन्हे आहेत.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ पाहण्यासाठी निवड समितीने दौरे सुरू केले आहेत. ‘मसाप’ इचलकरंजी शाखा, सदानंद साहित्य मंडळ औदुंबर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर येथून निमंत्रणे आल्याने स्थळ निवड समितीने या ठिकाणी भेटी देत पाहणी केली. दरम्यान, मुंबई साहित्य परिषदेचा कार्यकाळ संपल्याने साहित्य महामंडळ नुकतेच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे सातार्याचेच असल्याने अ. भा. मराठी साहित्य संमेलन सातार्यात व्हावे असा त्यांच्यावर सातारकरांचा दबाव आहे.
तसेच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याही मनात साहित्याबद्दल विशेष प्रेम व आपुलकी आहे. संमेलनासाठी शाहूपुरी येथील ‘मसाप’ शाखेने अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीला विशेष निमंत्रण दिले होते. त्यानुसार समितीने सातार्यात संमेलनस्थळ पाहणी केली. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची ‘सुरूचि’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवड समितीने चर्चा केली.
यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, स्वामी, सातार्यातील साहित्यिक, साहित्य संस्था व पदाधिकारी उपस्थित होते. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर करण्याबाबत रविवार पदाधिकार्यांची पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनस्थळाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सातार्याला होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संमेलनस्थळ निवड समितीकडून साहित्य संमेलनस्थळाच्या होणार्या घोषणेकडे साहित्यिक व रसिकप्रेमींचे लक्ष लागले आहे.