सातारा

सातार्‍यात दोघांना ९४ लाखांचा चुना; सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने फसवणूक

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सौरऊर्जा प्रकल्प उभारून देतो, असे सांगून त्यासाठी वेळोवेळी 93 लाख 65 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघे संशयित कर्नाटक व पश्चिम बंगाल राज्यातील असून त्यांनी सातार्‍यातील व्यावसायिकासह आणखी एकाला चुना लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संशयित आरोपींची फेसबुकवर ओळख झाली होती.

विशाल सिंग हरी बिरजे (रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) आणि रवी अधिकारी (रा. खाटीक रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमेश सदाशिव भोईटे (वय 40, रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे व्यावसायिक तसेच जागा खरेदी, विक्रीचा व्यवसाय करत आहेत. फसवणुकीची घटना दि. 1 मे 2020 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी फेसबुकवर शेंद्रे येथील एका प्लॉटची विक्री करण्याबाबतची पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पाहून संशयित विशाल याने तक्रारदार यांना संपर्क केला. संपर्क हळूहळू वाढल्यानंतर मे 2020 मध्ये दोघे संशयित सातारा शहरालगत महामार्गावर भेटले. ओळखीदरम्यान दुसरा संशयित अधिकारी हा आरबीआय, दिल्ली येथे कार्यरत असल्याचे सांगितले.

संशयित विशाल याने असे सांगितले की, तो सोलर प्रोजेक्ट उभारत असून यासाठी त्याला जर्मनी येथील कंपनीने 23 हजार कोटी रुपये पाठवले आहेत. संबंधित रक्कम भारतीय रिझर्व बँकेत जमा असून त्याबाबतचे काही कागदपत्रे तक्रारदार यांना दाखवली. तसेच सोलर प्रोजेक्ट उभा करणार असल्यास त्यासाठी मदत करेन, असेही संशयितांनी सांगितले. अशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर संशयित निघून गेले. पुढे फोनवरुन त्यांचा नेहमी संपर्क राहिला. कंपनीत गुंतवणुकीसाठी तक्रारदार तयार झाल्यानंतर किमान 10 लाख रुपये गुंतवावे लागतील असे संशयितांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पैशांची जुळवाजुळव केली व पैसे खात्यावर भरले. अशाप्रकारे प्रोजेक्टसाठी टप्याटप्याने संशयितांनी पैसे मागतील तसे ते पैसे पाठवत राहिले. पैसे खात्यावर पाठवत असल्याने त्याचे पुरावे होते. तसेच संशयित यासंबंधी विविध कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठवत होते. मात्र गोपनीय काम असल्याचे सांगून संबंधित कागदपत्रे लगेच डिलीट करत होते.

पैशांची वेळोवेळी मागणी होवू लागल्यानंतर तक्रारदार यांनी प्रोजेक्ट करायचा नसल्याचे सांगितले. मात्र त्यावर संशयितांनी प्रोजेक्ट रद्द केला तर पैसे बुडतील असे सांगितले. तोपर्यंत तक्रारदार यांनी हातउसने, दागिने मोडून, जागा विकून संशयितांना पैसे दिले. प्रोजेक्ट होत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी पैसे परत मागितल्यानंतर संशयितांनी फोन उचलण्याचे बंद केले. नंबर ब्लॉक केला. अशा प्रकारे तक्रारदार यांचे 56 लाख व तक्रारदार यांचे नातेवाईक महेश पवार यांच्याकडून 37 लाख 65 हजार रुपये घेवून संशयितांनी दोघांची 93 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT