सातारा : राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात 6 महिन्यांत 759 बेकायदा दारू अड्डे, विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करत 764 जणांना अटक केली. दरम्यान, या सहा महिन्यांतच जिल्ह्यातील मद्यपींनी 96 कोटी रुपयांची दारू रिचवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 17 कोटींची यामध्ये वाढ झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बेकायदा दारू उत्पादनावर, वाहतुकीवर, विक्रीवर आणि बाळगण्यावर नियंत्रण ठेवले जाते. त्यातून उत्पादन शुल्क गोळा करणे हे काम होते. यासाठी परवाने देणे, गुन्हे दाखल करणे, तपास करणे हा त्या प्रक्रियेचा भाग आहे. सातारा जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री राजरोसपणे होत आहे. त्यावर स्थानिक पोलिस व उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करुन नियंत्रण मिळवतात. मात्र दोन्ही विभागात मनुष्यबळाची संख्या तोकडी असल्याने बेकायदा दारू विक्रेत्यांचे फावत आहे.
सातारा एक्साईज विभागाच्या अंतर्गत कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर येथे कार्यालये आहेत. तसेच जिल्ह्यासाठी 1 भरारी पथक आहे. गेल्या सहा महिन्यात एक्साईज विभागाने कारवाईंचा धडाका केला आहे. 759 गुन्हे दाखल करत 764 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 2 कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमालामध्ये दारू, त्यासंबंधी कच्चा माल, 42 वाहने जप्त करण्यात आली आहेत.