File Photo
सातारा

जिल्ह्यातील 741 भाविक अयोध्या यात्रेच्या प्रतीक्षेत

ज्येष्ठांची देवदर्शनाची इच्छा कधी होणार पूर्ण? : तीर्थदर्शन योजनेला लागेना मुहूर्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्य सरकारने मोठ्या उत्साहाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी 1 हजार 129 लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातून निकष पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील 741 लाभार्थ्यांची निवड करुन अयोध्येला जाण्यासाठी तारीखही निश्चित झाली. मात्र, विधानसभेची आचारसंहिता लागल्याने देवदर्शनाची आस धरुन बसलेल्या ज्येष्ठांना वाट पहावी लागली. आता विधानसभा निवडणूक झाली आहे. मंत्रिमंडळही स्थापन झाले असून ज्येष्ठांची देवदर्शनाची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रातील सर्वधर्मीयांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषित केले होते. त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील एकाही भाविकाला या योजनेचा लाभ मिळाला नाही, या योजनेसाठी जिल्ह्यातून 1 हजार 129 अर्ज आले होते. मात्र त्याआधी विधानसभेची आचारसंहिता लागल्याने ही यात्रा रद्द करावी लागली. आता ही यात्रा होणार की नाही याबाबत अद्याप शासनाच्या काहीही सूचना आलेल्या नाहीत. दरम्यान, आता शासन स्थापन झाले आहे. ज्यांनी आश्वासन दिले त्यांचेच सरकार सत्तेवर आले आहे. प्रत्येक मंत्र्याला खातेवाटप झाले आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र यात्रेला आता तरी मुहूर्त काढावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील व देशातील तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून पात्र नागरिकांची यादी समाजकल्याण विभागाने तयारी केली आहे. शासनाकडून सूचना होताच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- सुनील जाधव, सहायक आयुक्त, समाजकल्याण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT