श्रीनगर; पीटीआय/वृत्तसंस्था : काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) 69 सक्रिय लाँचिंग पॅड आहेत. तेथून सुमारे शंभर ते एकशेवीस दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत, अशी माहिती बीएसएफचे काश्मीर फ्रंटियरचे आयजी अशोक यादव यांनी सोमवारी येथे दिली.
बीएसएफने लष्कराच्या समन्वयातून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे यावर्षी घुसखोरीचे चारवेळा प्रयत्न हाणून पाडण्यात आले. यादरम्यान आठ दहशतवादी मारले गेले, असे त्यांनी सांगितले. बीएसएफची गुप्तचर शाखा (जी युनिट) दहशतवादी गट आणि त्यांच्या हालचाली आणि कारवायांवर लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बीएसएफने नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागात लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी सीआरपीएफ जवानांसोबत 22 संयुक्त मोहिमा राबवल्या. यामध्ये उत्तर काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या कारवाईत एके 47 रायफल, एमपी-5 रायफल, पिस्तूल, हँड ग्रेनेड, यूबीजीएल, यूबीजीएल ग्रेनेड, चिनी ग्रेनेड, एमजीएल आणि वेगवेगळ्या कॅलिबरचे दारूगोळे यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. बीएसएफ काश्मीरमध्ये 343 किमी एलसीवर सैन्यासोबत जवळून समन्वय साधून एलओसीवर प्रभावी काम करत आहे. आमची जी युनिट नियंत्रण रेषेवरील सर्व 69 सक्रिय लाँचिंग पॅडस्वर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे आणि तेथील हालचालींवर आमच्या गुप्तचर शाखा लक्ष ठेवून आहेत, असे ते म्हणाले. अत्यंत प्रतिकूल हवामान, अविकसित आणि दुर्गम पर्वतीय प्रदेश, स्नायपिंग, युद्धबंदीचे उल्लंघन आणि फिदाईन हल्ल्यांच्या सततच्या धोक्यांसारख्या असंख्य आव्हानांना तोंड देत बीएसएफचे जवान पूर्ण उत्साह आणि निष्ठेने सैन्यासह नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी निर्भयपणे उभे आहेत, असे यादव म्हणाले.
एलओसी आणि अंतर्गत प्रदेशातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले सैन्य सज्ज आहे. बीएसएफने रात्रीच्या देखरेख आणि युद्ध क्षमतांमध्ये सुधारणांसह नवीन देखरेख उपकरणे आणि शस्त्रे समाविष्ट केली आहेत. एलओसीवरील घुसखोरीसारखी आव्हाने परतवून लावण्यासाठी सैन्याच्या प्रशिक्षणावर खूप भर दिला जात आहे, असे यादव म्हणाले.