सातारा : पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणावरील हरकतींच्या सुनावणीच्या प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम प्रभाग रचना सोमवार दि. 18 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. सुनावणीत पुसेगाव गटाचे नाव बदलून खटाव तर म्हासुर्णे गटाचे नाव बदलून पुसेसावळी केले आहे. गणातील काही गावात बदल झाले असून कोरेगाव व फलटण तालुक्यातील सर्व हरकती फेटाळल्या आहेत. 100 पैकी 68 हरकती अमान्य केल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गणांच्या पुनर्रचनेवर 9 तालुक्यातून 100 हरकती दाखल झाल्या होत्या. सातारा 34, खटाव 28, कोरेगाव 10, पाटण 7, कराड 4, फलटण 6, माण 8, खंडाळा 1, जावली 2 अशा 100 हरकतींपैकी 14 हरकती पूर्ण तर 12 हरकती अंशत: मान्य करत त्यावर आयुक्तांनी सुनावणी घेतली. 68 हरकती अमान्य केल्या. खंडाळा तालुक्यातील हरकती निकाली काढल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात हरकती, आक्षेपावर झालेल्या सुनावणीत कोरेगाव व फलटण तालुक्यातील हरकती फेटाळल्या.
वाई, महाबळेश्वर तालुक्यातून हरकती दाखल नव्हत्या. खटाव तालुक्याच्या हरकती सुनावणीमुळे रचनेत म्हासुर्णे व पुसेगाव गट केला होता. यावर त्या गटात पुसेसावळी व खटाव ही मोठी गावे असून या गावांची नावे गटाला देण्याबाबत मागणी आली होती. या मागणीप्रमाणे म्हासुर्णे गटाचे नाव बदलून पुसेसावळी गट, तर पुसेगाव गटाचे नाव बदलून खटाव गट केला आहे. सातारा तालुक्यातील पुनवडी, वेणेगाव, सोनापूरचा गट, गण बदलले आहेत. माण तालुक्यातील तोंडले, शंभूखेड, वाकी या गावांचे गट बदलले आहेत. पाटण तालुक्यातील म्हावशी गटातून येराड आणि ज्योतिबाचीवाडी दोन गावे कमी करुन ती गोकूळ हेळवाक गटात समाविष्ट केली आहेत. तारळे गटातून केरळ आणि धडामवाडी कमी करुन ती म्हावशी गटात समाविष्ट केली आहेत. कराडमध्ये जाधवववाडी बाबतची हरकत मान्य केली आहे. जावली तालुक्यातील वाकी, निपाणी दोन गावांच्या गणात बदल केला आहे.
अशा फेटाळल्या हरकती...
कराड 3, पाटण 1, जावली 1, माण 6, फलटण 6, कोरेगाव 10, खटाव 17, सातारा 24 अशा हरकती सुनावणीवेळी फेटाळण्यात आल्या आहेत. तर कराड 1,पाटण 3, जावली 1, माण 2, खटाव 4, सातारा 3 अशा 14 हरकती आयुक्तांकडून मान्य झाल्या आहेत. तर पाटण 3, खटाव 2, सातारा 7 अशा अंशत: हरकती मान्य करण्यात आल्या आहेत.