सातारा : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ४७ हजार ४६३ तर शिक्षक मतदारसंघासाठी ९ हजार ४५४ असे एकूण ५६ हजार ९१७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ तर पदवीधर मतदारसंघासाठी ९३ मतदान केंद्रे आहेत. संबंधित प्रांताधिकारी कार्यालयाकडून मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान केंद्रे, मतपेट्या आणि इतर निवडणूक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षक मतदारसंघात २३० अधिकारी व कर्मचारी तसेच १०८ मतपेट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तर पदवीधर मतदारसंघात ४६५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, ३८५ मतपेट्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मतपेट्या, मतदार याद्या, मतदार नोंदवही, मतदानासाठी आवश्यक नमुने आणि इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदानादिवशी सर्व मतदान केंद्रांवरील कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि नियुक्त कर्मचार्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. मतदारांना मतपत्रिकेवर संबंधित उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना निवडणूक अधिकार्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करणे बंधनकारक आहे. इतर पेनचा वापर केल्यास मत बाद होणार आहे.
नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ
शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील पात्र मतदारांनी मतदानापूर्वी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच आपले मतदान केंद्र कोणते आहे, याची माहिती आधीच तपासून घेण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत http://mahaelection.gov.in/Citizen/Search या संकेतस्थळावरील सुविधेचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खासगी कर्मचाऱ्यांना चार तासांची पगारी रजा
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी पात्र मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष पगारी रजा देणे खासगी आस्थापना, कंपन्या, मॉल्स, दुकाने व अन्य आस्थापनांना बंधनकारक आहे. या सवलतीच्या कालावधीतील वेतनात कोणतीही कपात करता येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त सु. तु. शिर्के यांनी स्पष्ट केले आहे.
पदवीधर मतदारसंघ
डॉ. स्मिता जाधव : भाजप
हर्षदा देशमुख-जाधव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
सुनील मोदी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिक्षक मतदारसंघ
कौस्तुभ गावडे : भाजप
जयंत आसगावकर : काँग्रेस
सचिन सानप : अपक्ष