Farmer's News File Photo
सातारा

Farmers News | जिल्ह्यात ५२८ हे. क्षेत्रावरील शेती उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील २ हजार ८३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. सुमारे ५२८.३९ हेक्टर बागायत व जिरायत क्षेत्रावरील खरिप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे.

या तालुक्यात १ हजार १३३ शेतकऱ्यांचे ४३४.३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप हंगामात कमी कालावधीत जादा पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठे आहे.

खरीप हंगामात सर्व अकराही तालुक्यांमध्ये पाऊस व हवामानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टीचा अनेक तालुक्यांना फटका बसला असून तेथील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा अधिक्षीका कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या आदेशानुसार कृषी विभागाने केले आहेत.

सातारा तालुक्यात शेतकऱ्यांचे ६७ ७.९३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. कोरेगाव तालुक्यातील ८ शेतकऱ्यांचे २.१५ खरीप पिकांचे तर २५ गुंठ्यावरील फळशेती, कराड तालुक्यातील ७ शेतकऱ्यांचे २.११ हेक्टर, पाटण तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांचे २१.१२ हेक्टर खरीप तर २ शेतकऱ्यांच्या १५ गुंठे फळशेतीचे, खंडाळा तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांचे २२ हेक्टरवरील खरीपाचे,

महाबळेश्वर तालुक्यातील ५३७ शेतकऱ्यांचे ४८.९१ हेक्टरवरील खरीप पिकांचे तर फलटण तालुक्यातील सार्वाधिक ४३४.३४ हेक्टरवरील १ हजार १३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ८८० शेतकऱ्यांचे ९२.३५ जिरायत तर १ हजार २०० शेतकऱ्यांचे ४३६.४ बागायत क्षेत्रावरील खरिपाचे तसेच ३ शेतकऱ्यांचे १ एकरावरील फळबागेचे नुकसान झाले आहे.

या पिकांचे नुकसान

जिरायत क्षेत्रात भात सोयाबीन, नाचणी, भुईमूग, आले तसेच ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे.

बागायती शेतीमध्ये केळी, बाजरी, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, बटाटा, मका, फुलझाडे, ऊस तसेच फळ पिकांमध्ये पपई व केळीचे नुकसान झाले आहे.

या पिकांना मिळणार भरपाई...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीपासून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई मिळते. केंद्र व राज्य सरकारने भुईमूग, सोयाबीन, मूग, बाजरी, कांदा, भात, ज्वारी, मका, उडीद या पिकांचा अधिसूचित पिकांच्या यादीत समावेश केला आहे.

खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या या पिकांपैकी कोणत्याही पिकाचे नुकसान झाले असेल आणि संबंधित शेतकऱ्याने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नोंदणी केली असेल तर संबंधित शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरु शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT