सातार्‍यात पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे 35 जणांना चावा घेऊन जखमी केले. PUdhari Photo
सातारा

सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 जणांना चावा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यात ऐन गणेशोत्सवात पिसाळलेल्या कुत्र्याने मोती चौकातून प्रतापगंज पेठ, बुधवार पेठ तसेच मंगळवार पेठेतील सुमारे 35 जणांना चावा घेतला आहे. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन पेठांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुकाकूळ घातल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सातारा नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली आहे.

सातार्‍यात गणेश भक्तीला उधाण आले आहे. मुख्य रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. गणेश दर्शनासाठी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. मंगळवारी गौरी आगमनाने उत्सवात आणखी भर पडली आहे. सातारा शहरात भक्तीचा आणि बाजारपेठेत खरेदीचा माहोल असल्याने मोती चौक परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. याच मोती चौकातून प्रतापगंज पेठेकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावर पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांचे लचके तोडायला सुरूवात केल्याने खळबळ माजली.

महिला, पुरूष, लहान मुले असे जे दिसतील त्यांना पिसाळलेले कुत्रे चावा घेत सुटले. त्यामुळे या परिसरात नागरिकांची घाबरगुंडी उडाली. जीवाच्या आकांताने प्रत्येकजण वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटला. प्रतापगंज पेठेत हाहाकार माजला. या घटनेची माहिती नगरसेवक किशोर शिंदे यांना मिळाली. त्यांनी तातडीने नगरपालिकेतील आरोग्य विभागाला माहिती दिली. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पिसाळलेले कुत्रे सापडले नाही.

मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास खरेदी करत असताना माझ्या मावशीला भटके कुत्रे चावल्याने ती जखमी झाली. यानंतर सिव्हिलमध्ये उपचार घेऊन 12 वाजता सोडण्यात आले. या घटनेने आम्हाला मानसिक व शारीरिक त्रास झाला असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा.
- अभिषेक परदेशी

दरम्यान, मंगळवार पेठेतील रामाचा गोट परिसरात 4 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केल्याची तक्रार नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी केली आहे. बुधवार पेठेत तीन जणांना हे पिसाळलेले कुत्रे चावल्याचे नगरसेवक शकील बागवान यांनी सांगितले. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जबर दुखापत झालेल्या रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांना लस देऊन घरी सोडले आहे.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांनी जिल्हा रूग्णालयात भेट दिली. भाग निरीक्षक, मुकादम यांच्याकडून पिसाळलेल्या कुत्र्यासाठी शोध मोहिम राबवली आहे. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत हे कुत्रे सापडले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिसाळलेला कुत्रा दिसल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू असून कर्मचार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू आहे. भटक्या कुत्र्यांच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन आणखी उपाययोजना करणार आहे.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT