Food Poisoning: उपवासाच्या भाजनी पिठातून 35 जणांना विषबाधा File Photo
सातारा

Food Poisoning: उपवासाच्या भाजनी पिठातून 35 जणांना विषबाधा

वडूजसह परिसरातील गावांतील घटना : बाधितांवर उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

वडूज : उपवासाच्या तयार भाजनी पिठाच्या भाकरी खाल्याने वडूज परिसरातील सुमारे 35 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी काहीजणांवर वडूज येथील खासगी हॉस्पिटल तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

खटाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या दुकानातून नागरिकांनी उपवासाच्या तयार भाजणीचे पीठ खरेदी केले होते. या भाजणी पिठाची भाकरी खाल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणे, मळमळ होणे, हात-पाय कापणे तर काही रुग्णांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला.

या रुग्णांमध्ये मांडवे येथील मिना सुनीलकुमार खाडेे, शोभा शरद खाडे, सुवर्णा जिजाबा डोईफोडे, सिमा सयाजी यादव, वंदना पाटील, मारुती फडतरे, सागर फडतरे, मिना प्रवीण राऊत, सीमा सयाजी यादव, अर्चना लक्ष्मण खाडे, लक्ष्मण ज्ञानदेव खाडे, मनीषा तानाजी जाधव, सुनीता जयवंत पाटील, अलका मारुती फडतरे, सुभद्रा मारुती खरात, सुभद्रा सुगंध गुरव-किरकसाल, शांता शरद पवार (रा. उंबर्डे), केदार किशोर तोडकर, संजीवनी मोहन तोडकर, अश्विनी सत्यजीत तोडकर (तिघेही रा.वडूज), गंगाबाई हणमंत निंबाळकर, शोभा प्रकाश घार्गे (रा.पळशी), लता खाडे, रंजना खाडे (रा.तडवळे), जयश्री जगन्नाथ शेटे (रा.कोकराळे), अंजना आनंदा जाधव, ऋतुजा आनंदा जाधव (रा.गुरसाळे), संगिता शिवाजी गुरव (रा.बनपुरी), माया विजय फडतरे (रा.वाकेश्वर), सुवर्णा प्रकाश पवार (रा.उंबर्डे), जयश्री रामचंद्र लोहार (रा.वडूज), वैशाली बापुराव गलंडे (रा. बोंबाळे), आक्काताई श्रीरंग मदने, रेखा रावसाहेब हिरवे (रा. गुरसाळे) यांचा समावेश आहे. यापैकी 25 रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये, 3 रुग्णांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. लिला मदने यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. तसेच ते दोघे परस्थितीवर नियंत्रण ठेवून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काहींना डिस्चार्जही मिळाला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

‘त्या’ दुकानदारांना समजपत्र...

याप्रकरणी अद्याप कोणत्याही रुग्णाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दुकानातून भाजणी पीठ खरेदी करण्यात आले, त्या वैभव ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स, साई बाजार या तीन मालकांना समजपत्र काढण्याबरोबरच अन्न व भेसळ विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT