विशाल गुजर
सातारा : राज्यातील पाच ते १८ वर्ष वयोगटातील सुमारे ३० लाखांहून अधिक मुले जास्त वजन व लठ्ठपणाने ग्रस्त असून, सध्याची स्थिती कायम राहिल्यास २०३० पर्यंत लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या एकूण प्रमाणात वाटा १० टक्क्यांहून अधिक असेल, असा इशारा ‘लेटस् फिक्स अवर फूड’ या धोरणपत्रिकेत देण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा परिसरात ५० मीटरवर जंक फूडला बंदी घातली आहे. आता शाळेमध्येही अशी बंदी गरजेची बनली आहे. असे झाले तरच मुलांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांना आळा बसणार आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या धोरणपत्रिकेनुसार राज्यात २७ टक्क्यांहून अधिक प्रौढ मधुमेह, २२ टक्क्यांहून अधिक उच्च रक्तदाब व २० टक्क्यांहून अधिक स्थूलतेने ग्रस्त आहेत. त्याचबरोबर मुलांमध्येही जंकफूड, जास्त साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांचे वाढते सेवन चिंताजनक ठरत आहे. धोरणपत्रिकेनुसार, राज्यातील शाळांमध्ये २ कोटी ७० लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, एक विद्यार्थी १० ते १२ वर्षांच्या कालावधीत सुमारे ८ हजार तास शाळेत घालवतो.
दररोज ६० मिनिटांचा व्यायाम बंधनकारक
अहवालात शाळेच्या कँटीनमध्ये तसेच शाळेबाहेरील परिसरात उच्च चरबी, साखर व मीठ असलेले पदार्थ सहज उपलब्ध असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी, शाळेच्या ५० मीटर परिसरात जंकफूड विक्री व जाहिरातींवर बंदी, विद्यार्थ्यांसाठी वार्षिक आरोग्य व पोषण अहवाल तयार करणे आणि दररोज किमान ६० मिनिटांचा शारीरिक व्यायाम बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सध्या ५ ते १८वर्षे वयोगटातील मुलांमध्ये बाहेरचे व अतिप्रक्रियायुक्त अन्न, साखरयुक्त पेये, मोबाईल-केंद्रित जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बालपणीचा लठ्ठपणा पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, सांधेदुखी तसेच मानसिक ताण व आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो.- सुनीता वैराट, आहारतज्ज्ञ