सातारा : परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. अद्यापही सातारा जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 319 वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यात एवढ्या नंबरप्लेट बसवून होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून ही नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अपघात किंवा गुन्ह्यात सहभागी होणारी वाहने सहजपणे पकडता यावीत. प्रत्येकाचे वाहन सुरक्षित राहावे म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेटचे बंधन घालण्यात येत आहे. तसेच अनेक गुन्हे व अपघातातील वाहने या नंबरप्लेटमुळे सहजपणे शोधता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 263 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली आहे. तर 2 लाख 79 हजार 281 वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.
जिल्ह्यात 5 लाख 54 हजार 600 वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. पण अद्यापपर्यंत 2 लाख 75 हजार 319 वाहनांना अद्यापही सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. परिवहन विभागाकडून अनेकवेळा मुदतवाढ देऊनही याकडे पाठ फिरवली जात आहे. अद्यापही 50 टक्के वाहनांना नंबरप्लेट बसवलेली नाही. सध्या तरी सुरक्षा नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओतील कोणतीही कामे होत नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढीसाठी शासनाकडून परिवहन विभागाने प्रस्ताव पाठवला असून त्याला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबरप्लेट लवकरात लवकर बसवण्यात यावी. जे वाहनधारक नंबरप्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.-दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा