खटाव : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळी खटाव तालुक्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक पर्जन्यवृष्टी होत आहे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धातील गेल्या दोन दिवसांत तालुक्याच्या उत्तर भागात दमदार विक्रमी पाऊस झाल्याने येरळा नदी दुथडी भरून वाहत आहे.नदीवरील नेर लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून 1042 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पात प्रतिसेकंद 1340 क्युसेक पाण्याची आवक होऊन धरणाच्या सांडव्यावरुन 1223 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुष्काळी भागातील एखाद्या धरणातून दुसर्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.
खटाव तालुक्यात यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने येरळा नदीवरील 1.15 टीएमसी क्षमतेचा येरळवाडी मध्यम प्रकल्प 31 जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाला होता. गेल्या पावणेतीन महिन्यात सांडव्यावरुन कधी आठशे, तर कधी हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु होता. 19 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस झाल्याने उत्तर भागातून वाहणार्या येरळा नदीच्या पाण्यात व पर्यायाने येरळवाडी धरणात येणार्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. तेव्हा खटाव, पुसेगाव, वडूज, खातगुण, रामओढा परिसरात तुफान पाऊस झाल्याने येरळा नदीला मोठा पूर येऊन येरळवाडी धरणात 6250 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरु होती. धरणाच्या सांडव्यावरुन तब्बल 6169 क्युसेक प्रतिसेकंद विक्रमी पाण्याचा विसर्ग सुरु होता. दुष्काळी भागातील एखाद्या धरणातून सहा हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु होता तेव्हा सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
नेर धरणात आतापर्यंत जिहे-कठापूर योजनेचे आलेले पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणात सोडण्यात आले होते. त्यामुळे धरण 100 टक्के भरले नव्हते. सध्या माण तालुक्यात जाणारे पाणी बंद असल्याने नेरही पूर्ण क्षमतेने भरुन 1042 क्युसेकचा विसर्ग येरळा नदीपात्रात सुरु आहे. आत्ता जिल्ह्यातील कोणत्याच मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु नसताना दुष्काळी खटावमधील दोन धरणांमधून सव्वादोन हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
कोयना धरणातील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उरमोडी, धोम, तारळी अशा मोठ्या धरणांमधील पाण्याच्या विसर्गाची नेहमीच चर्चा होते. दुसरीकडे दुष्काळी भागातील छोटे-छोटे पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरतात की नाही, याची शाश्वती नसते. खटाव, माण या भागातील तलाव, धरणे कधी भरलीच तर त्यातून शे-दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो. मात्र येरळवाडी धरणातून ऑगस्टमध्ये सहा हजारवर क्युसेक पाण्याचा झालेला किंवा सध्या सुरु असलेला विसर्ग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कोयना धरणासह इतर मोठ्या धरणांमधील विसर्ग सध्या बंद असताना दुष्काळी नेर आणि येरळवाडीतील मोठ्या विसर्गाचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.