सातारा : संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत अंतरवली सराटी येथून लढा उभारला. त्यानंतर सर्वत्र मराठा आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले काढण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ७५५ जणांनी दाखल्यासाठी अर्ज केला असून १४ हजार २०७ जणांना दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे, तर ४२६ जणांना अद्यापही दाखले मिळाले नसल्याचे समोर आले आहे.
कुणबी नोंदींच्या आधारे पात्र ठरणाऱ्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना कुणबी दाखल्यांचे वाटप सुरू झाले आहे. महसूल प्रशासनाकडून प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार सातारा तालुक्यात १ हजार ३३८ जणांनी अर्ज केला असून १ हजार १३८ जणांना दाखला मिळाला आहे, तर १९५ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. जावली तालुक्यात १ हजार ४३६ जणांनी अर्ज केला असून १ हजार ३११ जणांना दाखला मिळाला आहे, तर १२५ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. कोरेगाव तालुक्यात ३४६ जणांनी अर्ज केला असून २७८ जणांना दाखले मिळाले, तर ५७ जणांनी दाखले नाकारले आहेत. ११ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. कराड तालुक्यात २ हजार १७३ जणांनी अर्ज केला असून २ हजार ७३ जणांना दाखला मिळाला आहे, तर ३९ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत, तर ६१ जणांनी दाखले नाकारले आहेत.
पाटण तालुक्यात २ हजार ३४७ जणांनी अर्ज केला असून २ हजार ३३९ जणांना दाखला मिळाला आहे, तर ८ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. फलटण तालुक्यात १ हजार ३५२ जणांनी अर्ज केला असून १ हजार ३०४ जणांना दाखला मिळाला आहे, तर ४८जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. माण तालुक्यात १ हजार ७०५ जणांनी अर्ज केला असून १ हजार ७०२ जणांना दाखला मिळाला आहे, तर ३ जणांनी दाखले नाकारले आहेत. खटाव तालुक्यात १ हजार ३७० जणांनी अर्ज केला असून १ हजार ३६९ जणांना दाखला मिळाला आहे. एकाने दाखला नाकारला. वाई तालुक्यात १ हजार ४२ जणांनी अर्ज केला असून १ हजार ४२ जणांना दाखला मिळाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात २९२ जणांनी अर्ज केला असून या सर्वांना दाखले मिळाले आहेत. खंडाळा तालुक्यात १ हजार ३५९ जणांनी अर्ज केले होते. या सर्वांना दाखले वाटप करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४ हजार ७५५ जणांनी अर्ज केले असून त्यापैकी १४ हजार २०७ जणांना दाखले मिळाले आहेत, तर १२२ जणांनी कुणबी दाखले नाकारले असून अद्याप ४२६ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.
प्रलंबित अर्जांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर
कुणबी दाखला मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांना शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या विविध सवलती व योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. दाखले मिळवण्यासाठी नागरिकांकडून महसूल विभागाकडे अर्ज करण्यात येत आहेत. प्रलंबित अर्जांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. दरम्यान, दाखल्यांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणेकडूनच माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.