सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र संबंधित सदस्यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे 1 हजार 392 ग्रामपंचायत सदस्य अपात्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित सदस्यांना नोटीस काढण्यात येणार असून जिल्हाधिकार्यांसमोर सुनावणी होणार आहे. अपात्र होणार्या सदस्यांमध्ये काही सरपंच, उपसरपंचांचाही समावेश असल्याने संबंधित गावांमध्ये खळबळ माजली आहे. सदस्यांचे पदच जाणार असल्याने गावगाड्यातील सत्तासमीकरणे बदलणार असल्याची चिन्हे आहेत.
1 जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या 1 हजार 392 सदस्यांसाठी मात्र ही मुदतवाढ लागू होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे संबंधित सदस्य अपात्रतेच्या मार्गावर असून त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई सुरु केली आहे. संबंधित सदस्यांना वेळेवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरु केली आहे. लवकरच त्यांच्या कारवाईसंदर्भात नोटीस बजावण्यात येणार असून त्यांचे लेखी म्हणणे मागवले जाणार आहे. जिल्हाधिकार्यांसमोर होणार्या सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
या प्रकरणात सरपंच आणि उपसरपंच या पदावर कार्यरत असणार्या सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण तेही या कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये या कारवाईमुळे सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी नवीन निवडणुका घेण्याची गरज भासू शकते. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय परिणाम दूरगामी ठरणार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेमुळे संबंधित गावांमध्ये ही कारवाई पुढील काळात चर्चेचा विषय ठरणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्र हे आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे. संबंधित सदस्यांनी मुदतीत हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्या ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार असून कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेतले जातील.- संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा